दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२२ । फलटण । जिल्हांतर्गत बदली धोरणांमध्ये शासकीय जीआर नुसार दुर्गम क्षेत्र घोषित करण्यासाठी किमान तीन निकषांची आवश्यकता असताना सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन ऐवजी चार निकष तयार करून अवघड शाळांची यादी प्रसिध्द केली आहे.. त्यामुळे तीन निकष पात्र असणाऱ्या शाळा सुगम क्षेत्रामध्ये दाखवल्या आहेत त्यामुळे या धोरणांमुळे अनेक वर्षे दुर्गम भागात काम करीत असलेल्या शिक्षकांवर खूप मोठा अन्याय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना याचा फटका बसला आहे. शासनाच्या बदली धोरणांमध्ये किमान तीन निकषांची आवश्यकता असताना सातारा जिल्हा परिषदेने यामध्ये बदल करत राज्यभर 3 निकष पूर्ण करणाऱ्या शाळा दुर्गम केल्या असताना जीआर मध्ये छेडछाड करत तीन ऐवजी चार निकष करत दुर्गम भागातील शाळांची संख्या जाणीवपूर्वक कमी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दुर्गम शाळांची संख्या 800 च्या वर वाढत असताना सातारा जिल्हा पाटण जावळी महाबळेश्वर विचार करता खूप दुर्गम असून शाळा जाणीवपूर्वक त्या कमी करण्याचा अट्टाहास कोणासाठी चालला आहे हे समजत नाही. याप्रकरणी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन निकषानुसार शाळा घोषित करत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना देण्यात आले यावेळी दुर्गम क्रांती संघटनेचे अध्यक्ष महादेव गेजगे,प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पडर,उपाध्यक्ष निलेश घोरपडे,कोषाध्यक्ष आप्पासाहेब मोरे,संघटक चंद्रकांत जाधव,जनार्दन गार्डे,शशिकांत कदम,संजय लोखंडे,कुणाल गावडे,जितेंद्र वाघ आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.