स्थैर्य, केळघर, दि.२१: कोरोनामुळे जावळी तालुक्यातील मिठाई व्यावसायिक, तसेच इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. तालुक्यातील यात्रा हंगाम ता. 29 डिसेंबरपासून सुरू होत असून, यापूर्वी या व्यावसायिकांच्या व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाशी चर्चा काढून या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जावळी तालुक्यातील मिठाई व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सातारा येथे सुरुची पॅलेस येथे आमदार भोसले यांना भेटून व्यवसायाच्या अडचणींबाबत चर्चा केली. त्या वेळी आमदार भोसले म्हणाले, “”कोरोनामुळे मिठाई व्यावसायिकांसह इतरही व्यावसायिकांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ता. 23 मार्चपासून लॉकडाउन असल्याने या व्यावसायिकांना व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांवर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जावळी तालुक्यातील यात्रा हंगाम सुरू होत असून, त्यापूर्वी प्रशासनाशी चर्चा करून निश्चित तोडगा काढून हे व्यवसाय पूर्ववत सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत. त्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या वेळी जावळी तालुका मिठाई विक्रेते संघटना, कटलरी व्यवसाय संघटना, बांगडी व्यावसायिक, नारळ व हार विक्रेते संघटनांच्या वतीने आमदार भोसले यांना निवेदन देण्यात आले. मिठाई विक्रेते संघटनेचे निमेश वारागडे, संपत शिंदे, संजय खताळ, रामचंद्र शिंदे, अंकुश बेलोशे, भाऊ पवार, प्रमोद पवार, दत्तात्रय वारागडे यांच्यासह मिठाई विक्रेते संघटनेचे सभासद उपस्थित होते.