लघु वृत्तपत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु : आमदार दिपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 03 मार्च 2024 | फलटण | ‘‘जिल्हा स्तरावरुन प्रसिद्ध होणार्‍या विशेषत: छोट्या वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांकडे यापूर्वीही आपण शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचा पाठपुरावा करुन जिल्हा वृत्तपत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्‍चितपणे प्रयत्न करु. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत’’, असे फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाच आमदार दिपक चव्हाण यांनी सांगितले.

येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्यालयास आ.दिपक चव्हाण यांनी भेट देवून जिल्हा वृत्तपत्र संपादकांसमवेत त्यांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. सदर चर्चेदरम्यान महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी , ‘‘शासकीय जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांवर अन्याय होत आहे. शासनाकडून छोट्या वृत्तपत्रांसंबंधी विविध अटी लावल्या जात असल्याने या छोट्या वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नांबाबत शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यासगटात छोट्या वृत्तपत्रांचा व पश्‍चिम महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी नसून हे अन्यायकारक आहे. शासकीय अधिस्वीकृती पत्रिका, ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना आदी सुविधांमध्ये विविध जाचक अटी आहेत. या सर्व प्रश्‍नांकडे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून राज्यातील जिल्हा वृत्तपत्रांना उचित न्याय मिळवून द्यावा’’, अशी मागणी आमदार दिपक चव्हाण यांना केली. त्यावर बोलताना आ.दिपक चव्हाण यांनी वरील आश्‍वासन दिले.

प्रारंभी आ.दिपक चव्हाण यांचे रविंद्र बेडकिहाळ यांनी ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देवून स्वागत केले. त्यानंतर जिल्हा वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांबाबतचे सविस्तर निवेदन आ.चव्हाण यांना सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक बापुराव जगताप, अ‍ॅड.रोहित अहिवळे, सौ.अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले, प्रशांत अहिवळे यांनी सहभाग घेतला. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून आ.दिपक चव्हाण यांनी केलेल्या कामकाजाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!