माढा लोकसभा आम्हालाच पाहिजे : श्रीमंत रामराजे; अजितदादांकडे मागणी करणार


दैनिक स्थैर्य | दि. 03 मार्च 2024 | पंढरपूर | आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण ताकतीने लढवण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असून माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळाला पाहिजे. याबाबत येत्या 6 मार्च रोजी मतदारसंघाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आयोजित केली आहे. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळाला पाहिजे. अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वजण मांडणार आहोत; अशी माहिती विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर श्रीमंत रामराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडून देण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठी असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच हा मतदार संघ सुटला पाहिजे; यासाठी आम्ही सर्वजण ताकतीने आमचे नेते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार आहोत. त्याबाबतच आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या बद्दल प्रेम व आदर कायमच राहिले आहे. परंतु ज्यावेळी निर्णायक वेळ घेण्याची वेळ आली होती; तेव्हा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत आहोत. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतानाच सर्व बाबींचा विचार आम्ही केला आहे; असेही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!