श्रीराम कारखान्याच्या शेअर्स संकलनात अडवणूक झाल्यास दहा हजारांचा मोर्चा काढू : श्रीमंत रामराजेंचा इशारा

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२६ | फलटण |
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्स संकलन प्रक्रियेत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अडवणूक अथवा राजकीय हस्तक्षेप झाल्यास दहा हजार लोकांना घेऊन प्रांत कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला. दरम्यान, शेअर्स संकलनातून कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

साखरवाडी येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्सबाबत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, तरडगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गिरीश बनकर, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर उपस्थित होते.

आ. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, श्रीराम कारखान्यात राजकारण कोणी आणले? आम्ही आणले का? सभासदांची यादी अंतिम होणार असताना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती कोणी आणली, प्रशासक कोणी नेमला आणि निवडणुका कोणी पुढे ढकलल्या, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने ही बॉडी नेमली आहे. या बॉडीला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. शेअर्स गोळा करून श्रीराम कारखाना पुन्हा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत प्रशासनाकडून अडवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास दहा हजार लोकांना घेऊन स्वतः प्रांत कार्यालयावर मोर्चा काढू. श्रीराम कारखाना राजकीय हेतूने बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून त्यामागे सत्तेची साथ आहे. स्वराजचा फायदा होईल, या राजकीय हेतूने श्रीरामच्या विरोधात राजकारण केले जात आहे. माझे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उघड आव्हान आहे, त्यांनी प्रथम स्वराज कारखान्याचे अकाउंट बाहेर काढावे. किती क्रशिंग केले, कोणत्या भागातून ऊस आणला, रिकव्हरी किती होती आणि शेतकर्‍यांना दर किती दिला, हे सांगावे.

आ. रामराजे म्हणाले, आमचे काही चुकत असेल तर आम्हाला कारखाना देऊ नका. मात्र, ज्यांना कारखाना हवा आहे त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर आणि विश्वासराव भोसले यांनी प्रत्येकी सात कोटी रुपये उभे करून कारखाना चालवावा. आम्ही त्यामध्ये पडणार नाही. मात्र, आम्ही आता शेअर्स गोळा करून श्रीराम कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!