‘स्व. भाऊसाहेब महाराजांचा आदर्श आणि वारसा अखंडपणे चालवू’; ८२ व्या जयंतीनिमित्त ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्धार


सातारा तालुक्याचे भाग्यविधाते आणि अजिंक्य उद्योग समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्यावर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्व. भाऊसाहेब महाराजांचा सहकारातील आदर्श वारसा अखंडपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्थैर्य, सातारा, दि. १७ : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून अलौकिक क्रांती घडवली. ‘अजिंक्य उद्योग समूहा’तील अनेक संस्थांसह त्यांनी तालुक्यात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून सर्वांना समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत, कायम शेतकरी हित जोपासण्याचा त्यांचा वारसा आम्ही अखंडपणे चालवू, असा दृढ निर्धार स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या ८२ व्या जयंतीदिनी करण्यात आला.

शनिवारी (१६ मे) सकाळी ‘अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे’ कार्यस्थळावर स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला होता.

स्व. भाऊसाहेब महाराजांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “भाऊसाहेब महाराजांनी केवळ सहकारी संस्था उभारल्या नाहीत, तर त्यांना सक्षम पाठबळही दिले. संस्था उभारीस येऊन त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी सहकारमंत्री असताना राज्यभरातील सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरू आहे. त्यांची विचारसरणी, आत्मसन्मानपूर्वक वागणूक, निस्वार्थी आणि अभ्यासू वृत्ती यांची कास धरून सहकार चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिले पाहिजे. त्यांची विकासकामाची धुरा आपण सर्वजण जोमाने पुढे नेऊ.”

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करण्याची शपथ घेतली.

मान्यवरांची उपस्थिती:

या अभिवादन कार्यक्रमाला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

याशिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अनिल देसाई, अजित साळुंखे, कामेश कांबळे, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, सातारा बाजार समिती सभापती विक्रम पवार, जावली बाजार समिती सभापती जयदीप शिंदे यांच्यासह अजिंक्य उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मजूर, कारखान्याचे अधिकारी, कामगार आणि सातारा-जावली तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!