दहशतीच्या संस्कृतीपासून कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी आपल्याला वेगळा राजकीय निर्णय घ्यावा लागला – श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
राजकीय संस्कृती बिघडल्याने सध्या फलटण शहरात दहशतीची संस्कृती फोफावली आहे. त्यामुळे या संस्कृतीपासून कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी आपल्यावर अनंत उपकार असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या माणसाला दुखावून आपणास वेगळा राजकीय निर्णय घ्यावा लागला, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

कोळकी (ता. फलटण) येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत कोळकी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलीक नाळे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सरपंच स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे व सर्व कोळकी ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.

श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटणमध्ये आज नेहमी धोम-बलकवडीचा उल्लेख केला जातो, जर शरद पवार नसते तर हा प्रकल्प झालाच नसता, हे आपण वेळोवेळी बोललो आहे व मान्य केले आहे. पवार यांचे वैयक्तिक अनेक उपकार माझ्यावर व तालुक्यावर आहेत. येथील महत्त्वपूर्ण विकासकामांवर शरद पवारांची छाप आहे. तरीही आम्हास तालुक्यातील राजकीय दहशत संपविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मालोजीराव नाईक निंबाळकर यांच्यासारख्या विभूतींच्या सुसंस्कृत विचारांचा वारसा आहे. त्यामुळे पुढील काळातील नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं, हाच खरा प्रश्न सातारा जिल्ह्यासमोर आला आहे. यामुळे आपल्याला सावध पावले टाकावी लागणार आहेत. राज्यात तीन पक्षाचं नेतृत्व आहे. त्यामुळे विरोधकांशी तडजोड करायची का, अशी धास्ती कार्यकर्त्यांमध्ये आहे; परंतु स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी टिकत नाही, त्यामुळे फलटणचं राजकारण हे आपल्याच पध्दतीने होणार व होत राहणार, असेही रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपली वाट ही भविष्याची व विकासाची आहे. या संस्कृतीत विकासाच काम करणं ही आपली ’जात’ आहे व तोच आपला ‘धर्म’ आहे, असेही रामराजे यावेळी म्हणाले.

कोळकी गावाची नगरपंचायतीकडे वाटचाल
यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा देशमुख यांच्या क्रिडांगणाच्या मागणीचा धागा पकडून कोळकी येथे सर्व सुविधांयुक्त क्रिडांगण साकारण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू, असे सांगत कोळकी गावचा झपाट्याने होत असलेला विस्तार पाहता ही ग्रामपंचायत उद्याच्या काळात नगरपंचायत करून घेण्याच्या दृष्टीने आपणास वाटचाल ठेवावी लागेल, सांगून कोळकी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे संकेत दिले.


Back to top button
Don`t copy text!