
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025 । फलटण । सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या सोळशी धरण प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या दालनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सचिन पाटील, बाबासाहेब देशमुख, भापजा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, ज्येष्ठ नेते हनुमंतराव (आप्पा) मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सोळशी धरण पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उचित कार्यवाही करावी.
सोळशी धरणामध्ये जी गावे बाधित व अशंता बाधित होणार आहेत; अश्या सर्व गावांचे पुनर्वसन हे महाबळेश्वर तालुक्यातच खाण्यात येईल. त्यांना अन्य कोणत्याही तालुक्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी यावेळी दिले.
सोळशी धरण प्रकल्प उभा राहिल्यानंतर याचा फायदा सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव व माण तालुक्यात होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सोळशी धरण उभे राहणे आवश्यक असल्याची आग्रही मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली आहे.
सोळशी धरण प्रकल्पासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव व माण या तालुक्यांना या धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार असल्याची माहिती यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली.