पावसामुळे सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीवर ‘पाणी’, क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट


 

स्थैर्य, काशीळ, दि.१०: स्ट्रॉबेरीच्या मागील हंगामास कोरोनाचा बसलेला फटका, लागवडीच्या कालावधीत परतीच्या पावसाचे घातलेले थैमान, तसेच पुढील काळात स्ट्रॉबेरी विक्रीवर परिणाम होण्याची भीती याचा परिणाम स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रावर झाला आहे. महाबळेश्वरसह, वाई, जावळी, कोरेगाव तालुक्‍यांतील स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात एक हजार एकरावर घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक अडीच हजार एकर, तर वाई, जावळी, कोरेगाव, सातारा, पाटण या पाच तालुक्‍यांत सुमारे एक हजार क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. सातारा, खटाव, पाटण तालुक्‍यातही काही प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणली जातात. हरितगृहात या मातृरोपांद्वारे शेतात लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली जाते. मागील हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोरोना आल्यामुळे लॉकडाउन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांवर स्ट्रॉबेरी फेकून देण्याची वेळ आली. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला, तसेच अमेरिका, इटली या देशांमधून सर्वाधिक मातृरोपे आणली जातात. मात्र, याच देशात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे काहीस विलंब झाला. मात्र, त्यानंतर रोपे आल्यानंतर त्यापासून रोपे निर्मिती सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता. लागवडीच्या काळामध्ये महाबळेश्वरसह जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले. यामुळे काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. यानंतर पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली. 

जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीची लागवड अंतिम टप्प्यात आली असून, जवळपास दहा ते 15 टक्के लागवड अद्यापही बाकी आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वसाधारण अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी केली जाते. यंदा मात्र, सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्‍यातील लागवड क्षेत्र 500 एकरने घटलेले आहे. वाई, जावळी, कोरेगाव, सातारा, पाटण या पाच तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर लागवड होते; मात्र यंदा या तालुक्‍यांत 500 एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, जवळपास 20 ते 25 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

कोरोना संसर्गाचा परिणाम : मागील हंगामात कोरोनामुळे स्ट्रॉबेरी विक्री करता आली नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. अजूनही कोरोनाची भीती असल्याने महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटक कमी येणार आहेत, तसेच इतर राज्यांत स्ट्रॉबेरी जाईल का नाही ही शंका मनात असल्यामुळे शेतकऱ्यांनी क्षेत्रात घट केली आहे. याचा परिणाम उत्पनावर होणार आहे. 

कोरोनामुळे स्ट्रॉबेरीची विक्री कितपत होईल यांची शेतकऱ्यांच्या मनात धास्ती असल्याने क्षेत्रात घट झाली आहे. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकावर परिणाम झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!