
थेट WhatsApp वर मिळवा
वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे दिवाळीत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या गंभीर हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध तसेच रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शिक्षण विभाग पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याबाबत विशेष शपथ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय स्तरावर जनजागृती उपक्रम
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, शाळांच्या परिपाठाच्या वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना ही शपथ दिली जाणार आहे. या शपथेद्वारे विद्यार्थी चालू वर्षीच्या दिवाळीत फटाके न वाजवण्याचा तसेच आपल्या कुटुंबीय आणि मित्रांनाही त्यापासून परावृत्त करण्याचा संकल्प करणार आहेत. या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव वाढीस लागून येणारी दिवाळी अधिक सुरक्षित आणि निरोगी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





