दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । माण । माण तालुक्यातील वाकी येथे माण नदी पात्रातील वाळू चोरी केलेल्या वाळू साठ्यावर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या पथकाने कारवाई केली होती. दरम्यान 72 हजार किमतीच्या 12 ब्रास वाळूचा साठा जप्त केला होता. ज्या अर्थी पोलीस पाटील महादेव मनोहर साठे हे कर्मचारी वाकी या ठिकाणी कार्यरत असून वाकी या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत गौण खनिज वाहतूक व साठा करत असल्याचे निदर्शनास आले असल्याने प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी वाकी येथील माण नदीच्या पात्रात जवळील ठेंंगीलवस्ती परिसरात गट नंबर 158 मधील पडीक क्षेत्रात वाळू उपसा करून तो विक्रीसाठी त्याचा केला होता. त्याठिकाणी प्रांताधिकारी व वाळू पथकाने छापा घालून अवैधरित्या केलेला साठा जप्त केला . यावरून श्री महादेव मनोहर साठे पोलीस पाटील वाकी यांनी शासकीय कामात अक्षम्य बेजबाबदारपणा केल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. सदरची चुक अति गंभीर स्वरुपाची असल्याचे दिसून आल्याने त्यांचे विरोधात विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.
पोलीस पाटील साठे यांनी अनाधिकृत गौण खनिज रोखणे बाबत व दंडात्मक कारवाई करणेबाबत नेमून दिलेल्या कामात टाळाटाळ केली आहे. सजा कार्यक्षेत्रात अनाधिकृत गौण खनिज वाहतूक होत असल्याचे व साठा केलेचे आढळून आले आहेत. त्याचबरोबर अनाधिकृत गौण खनिज वाहतूक संदर्भात कुठल्याही प्रकारचे कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पदास नेमून दिलेल्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. अशा अनेक अति गंभीर चुका आढळून आल्या आहेत.
यावरून महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी आदेशान्वये महादेव साठे वाकी पोलीस पाटील यांना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 9 (घ) अन्वये दि. 12 सप्टेंबर पासून शासकीय सेवेतून निलंबन करण्यात आले आहे . पोलीस पाटील हे पद मानधनावर असल्याने साठे यांना निलंबन निर्वाह भत्ता देता येणार नाही.