
स्थैर्य, 30 जानेवारी, सातारा : सातारा शहरातील पारंगे चौकात नव्याने सुलभ स्वच्छतागृह बांधण्यात आलेले आहे. परंतु कित्येक महिने झाले तरी उद्घाटना वाचून हे सुलभस्वच्छतागृह बंद आहे. या ठिकाणी येणा-या नागरिकांची गैरसोय होत असताना सातारा नगरपालिका मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
शहरातील पारंगे चौक हा नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी एसटी स्टॅड, बॅक, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय तसेच हॉटेल आहेत. दररोज हजारो प्रवासी या परिसरातून जात असतात. पुरुषाच्या तुलनेत महिलांचे ही प्रमाण सारखेच आहे. या प्रवासादरम्यान त्यांना शौचालयास जाताना गैरसोय होत होती. ही बाब विचारात घेता सातारा नगरपालिकेने या चौकालगत पुरुष व महिलांसाठी पे अॅन्ड युज असे शौचालय बांधले आहे.
हे स्वच्छतागृह बांधून एक वर्ष झाले आहे. परंतु अद्याप हे सुरु झालेले नाही.
या शौचालयासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र उद्घाटनाचा मुहुर्त मिळत नसल्याने सातारा नगरपालिका बघ्याची भूमिका घेत आहे. तर शौचालय नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय वाढली होती. तशीच अवस्था शौचालय बांधून ही कायम आहे.यामुळे पालिकेचे हजारो रुपये वाया गेल्याची चर्चा होत आहे. हे शौचालय कधी सूरु होणार, नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा पाठपुरावा करणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहेत.

