मतदान पथकाने घेतले ८५ वर्षांवरील व दिव्यांग मतदारांचे घर भेटीद्वारे मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ८५ वर्षांच्या वर वय असलेले मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्याबाबतीत मतदान पथकाने घरी भेट देऊन त्यांचे मतदान करून घेण्याची सुविधा यावेळी प्रथमच उपलब्ध करून दिलेली आहे. शनिवारी वय वर्ष १०३ असलेल्या मतदार श्रीमती कस्तुरबाई पुलचंद दोशी यांचे या लोकशाही उत्सवात मतदान करून घेतले. तसेच नांदल (ता. कोरेगाव) येथील १०५ वर्षांच्या पाटोळे आजींचेही मतदान पथकाने घरी जाऊन मतदान करून घेतले.

४३ माढा लोकसभा मतदारसंघामधील २५५ फलटण-कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघांमध्ये या निर्देशाप्रमाणे गृहभेट देऊन मतदान पथकामार्फत मतदान करून घेण्याची कार्यवाही दि. २६ एप्रिल २०२४ ते दिनांक २९ एप्रिल २०२४ अखेर चालणार आहे. यासाठी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा स्वतंत्र मतदान पथके तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक व्हिडिओ ग्राफर, एक पोलीस कर्मचारी तसेच एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे.

यासाठी गेल्या महिन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले असून ज्या मतदारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यांचे घरी भेट देण्यात येत आहे.

‘गृहभेटीद्वारे मतदान’ हा केवळ एक पर्याय असून अशा कोणत्याही मतदारास त्याची शारीरिक परिस्थिती चांगली असून इच्छाशक्ती असल्यास मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येते; परंतु एकदा गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारल्यास त्या मतदारास कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही. त्यामुळे जे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदार अतिशय दुर्बल किंवा अंथरुणास खिळून आहेत आणि मतदान केंद्रावर अजिबात जाऊ शकत नाहीत, त्यांनीच हा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले होते. त्यास अनुसरून फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३८७ वयोवृद्ध (८५ वर्षावरील) आणि ६८ दिव्यांग अशा एकूण ४५५ उमेदवारांनी गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे.

या सर्व मतदारांना गृहभेटीचा दिनांक आणि वेळ बीएलओमार्फत तसेच दूरध्वनीद्वारे आगाऊ कळवला जातो. काही कारणास्तव सदर मतदार त्यावेळी घरी उपस्थित नसल्यास त्याला पूर्वकल्पना देऊन आणखी एक वेळेस त्याच्या घरी भेट दिली जाते; परंतु दुसर्‍या वेळेसही सदर मतदार घरी अनुपस्थित असल्यास पुन्हा कोणतीही भेट दिली जात नाही. एकदा गृहभेटीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला की कोणत्याही परिस्थितीत त्या मतदारास मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करता येत नाही, ही बाब ध्यानात ठेवायची आहे.

भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली ही सुविधा खरोखरच किती उत्तम आहे, याची प्रचिती आज आली. जेव्हा फलटण शहरामध्ये श्रीमती कस्तुरबाई पुलचंद जोशी या १०३ वर्षाच्या अंथरुणाला खिळून असलेल्या आजींनी गृहभेटीद्वारे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदविला. त्यांचा आदर्श समोर ठेवून फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांनी दिनांक ७ मे २०२४ रोजी होणार्‍या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे सर्व मतदारांना करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!