दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
सप्तसूर संगीत कला सामाजिक संस्था सातारा आणि नील इव्हेंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ‘विठ्ठल रंग’ हा आगळावेगळा भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील दोन तळपते तारे पंडित आनंद भाटे आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरामृताने जणू भक्तीरसाचा महापूरच यावेळी आला होता. सुमारे १००० रसिकांनी त्याचा मनमुराद आस्वाद घेतला.
‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ या पारंपरिक नमनाने सुरू झालेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला आणि संत कान्होपात्रांच्या अभंगाने संपन्न झाला. अनेक परिचित अभंग या महान कलाकारांच्या गोड गळ्यातून प्रत्यक्ष ऐकताना सातारकर मंत्रमुग्ध झाले होते.
पंडित आनंद भाटे हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या बालगंधर्व सिनेमातील पार्श्वगायनाने ते घराघरात पोहोचले आहेत.
पंडित रघुनंदन पणशीकर हे पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्याकडून प्रशिक्षण लाभलेले जयपूर अत्रोली घराण्याचे ख्यातनाम गायक आहेत. दोन्ही गायकांची शैली भिन्न असली तरी योग्य ताळमेळ साधत हा ‘विठ्ठल रंग’ खुलवून अशा उंचीवर नेला की, कार्तिकी एकादशीच्या शुभ पर्वावर साक्षात वैकुंठ अवतरल्याचा आभास मंचावर झाला होता. पूर्वार्धात दोघांनी आपापली पेशकश स्वतंत्रपणे सादर केली. श्रोते उत्स्फूर्तपणे दाद देत होते. सभागृहात चैतन्य ओसंडून वाहत होते. दोन्ही गायक समरसून गायले. रसिकांनीही गायकीचा भरभरून आनंद लुटला. उत्तरार्धात दोन्ही गायकांनी एकत्र सादरीकरण केले. अभंग शृंखला हा आगळावेगळा अविष्कार नवीन होता, पण तो खूपच भावला. एकाला एक जोडून अनेक अभंग रचनांचा सुंदर हार विठूरायाला अर्पण केला. यावेळी ऐकणारांचे कान आणि मन तृप्त झाले.
चार तास झाले तरी हे पर्व संपूच नये, असं सार्यांना वाटत होतं. या गंधर्व गायकीला तितकीच तोलामोलाची साथसंगत लाभल्याने एकूण मैफिलीची रंगत वाढतच गेली. सुयोग कुंडलकर यांची संवादिनीवर लीलया फिरणारी बोटे अचंबित करत होती. भरत कामत यांच्या तबल्यावर श्रोते टाळ्या वाजवून दाद देत होते.
प्रथमेश नारळीकर यांच्या पखवाजाने आणि आदित्य आपटे यांच्या तालवाद्याने वेगळी खुमारी आली. हा भक्ती रंग शब्दसुमनाने सजवणार्या मृदुला फुलकर यांनी आपल्या निरूपणाने साक्षात संत मेळ्याचे दर्शन घडविले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, योगीराज चांगदेव, संत नामदेव महाराज, विसोबा खेचर, संत जनाबाई, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरित्राचा मागोवा घेत रंजकता आणली. मध्यंतरी प्रायोजकांचे सत्कार केले.
यावेळी आँकोलाईफ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या तज्ञ डॉक्टर मंडळींचे सत्कार चेअरमन श्री. देशमुख सर आणि त्यांचे सहकारी श्री. राजेमहाडिक यांच्या हस्ते केले. सौ.स्मिता शेरकर यांनी सप्तसूर संस्थेची माहिती व कार्यप्रणाली थोडक्यात विशद केली. सौ. रोहिणी इनामदार मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष डॉक्टर सुधाकर बेंद्रे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. धीरेंद्र राजपुरोहित, सुधीर चव्हाण, चंद्रशेखर बोकील, प्रकाश सावंत, डॉ. उमेश देशमुख, सुनील भोजने, सोपान तात्या साळुंखे, शेरकर सर, अॅड.अघोर सर, अॅड. इंद्रजित बेंद्रे, डॉ. सुनील पटवर्धन, विलास साबळे, चंद्रकांत माने, चंद्रकांत शिंदे, रेवती बंड, वैशाली चंद्रसाली, सुप्रिया चव्हाण, प्रिया अघोर, सतविंदर कौर या सप्तसूरच्या सर्व सदस्यांनी आतोनात कष्ट घेतले. ड्रेस वेलचे श्री. दत्ता काळे यांनी नियोजनात अनमोल मार्गदर्शन केले आणि मध्यंतरात सर्व प्रेक्षकांना कॉफीपान दिले.