तांदूळ महोत्सवाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । पुणे । कृषि विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदूळ महोत्सवाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. महोत्सवातील स्टॉलधारक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत ग्राहक होऊन तांदूळ तसेच विविध शेती उत्पादनांची खरेदी केली.

कृषी विभागाच्या आवारात भरलेल्या महोत्सवाला भेट देत शेतकऱ्यांकडून शेती उत्पादनाची खरेदी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनाला मिळणारी बाजारपेठ आदी विषयांसह पुणे महानगरात शेतकरी ते ग्राहक थेट कायमस्वरूपी बाजारपेठ उभारण्याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून होत आहे. पुणे  जिल्ह्यातील कृषि व आत्मा विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पुण्यात तांदूळ महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना बाजारपेठ देण्याचा  चांगला प्रयत्न आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीव्यवस्था कृषी विभागाच्या आवारात कायमस्वरूपी उभी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तांदूळ महोत्सवातील स्टॉलमध्ये सेंद्रीय शेती, पर्यावरण प्रेमी, आरोग्य, तसेच नवीन गरजेप्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादने विक्रीसाठी आणली ही चांगली सुरूवात आहे. आजच्या स्टॉलधारक शेतकऱ्यांची एकत्रित वेबसाईटवर नोंदणी केली तर ग्राहकांना खरेदीही सुलभ होईल. तांदूळ महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचे महत्त्वाचे पाऊस असल्याचा उल्लेखही श्रीमती गोऱ्हे यांनी केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी तांदूळ महोत्सवाबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!