तुका म्हणे मायबापे अवघी देवादाचीच रुपे !! – तुकाराम महाराज.आई – वडिलांमधील देवत्व त्यांचे विचार व आदर्शातून आमच्या सोबत
दि. ५ मे २०२१ रोजी वडिलांचे स्व. उदयसिंह नानासाहेब निंबाळकर यांचे आणि त्यानंतर दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी मातोश्री श्रीमती विमलताई उदयसिंह निंबाळकर तथा काकी यांचे निधन झाले, आणि “मायबापे अवघी देवादाचीच रुपे” या जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या उक्ती प्रमाणे आम्ही या देव रुपांना, त्यांच्या प्रेम, मार्गदर्शन आणि सन्मार्गावरुनच चालण्याचे अखंड शिक्षण देणाऱ्या किंबहुना त्यासाठी सतत आमच्यावर लक्ष देणाऱ्या या थोर महात्म्यांना मुकलो हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही, इतके उत्तम शिक्षण, मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिले की ते आमच्यासाठी देवच होते, पुढेही राहतील, ते गेले तरी त्यांनी दिलेल्या विचारातून त्यांचे देवत्व सतत आमच्या पाठीशी असल्याचे आम्ही नित्य जाणतो आहोत.
काकिंमध्ये माता पित्यांचे सानिध्य अनुभवले : आता मात्र पोरके झालो
वडिलांचे छत्र हरपले, आणि आमचा आधारवड गेला, आमचा खुप मोठा आधार गेला तथापि त्यांच्या प्रमाणेच आम्हाला सतत मार्गदर्शन केलेल्या मातोश्री त्यावेळी आमच्या सोबत असल्याने थोडा दिलासा मिळाला, त्यानंतर सुमारे २ सव्वा दोन वर्षे आम्ही मातोश्री श्रीमती विमलताई निंबाळकर तथा काकी यांच्या मध्ये माता पिता दोघांचे सानिध्य असल्याची जाणीव ठेवून, तशा भावनेने कार्यरत राहिलो, पण गतवर्षी मातोश्रींचे इहलोक सोडून देवलोकी स्व. काकांच्या भेटीसाठी जाणे झाले, तेंव्हा पासून गेले सुमारे वर्षभर आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो आणि या दोघांचे मार्गदर्शन, त्यांचे आदर्श, त्यांनी घालुन दिलेले कौटुंबिक, सामाजिक, व्यवसाय क्षेत्रातील आदर्श जपत वाटचाल सुरु ठेवली आहे, पण त्यांच्या केवळ आदर्श आणि विचारातून त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय हे सारे पुढे नेणे किती अवघड, कठीण आहे, याची जाणीव आम्हाला गेल्या तीन सव्वा तीन वर्षांपासून होत आहे, पण स्व. काकिंच्या जाण्यापासून गेल्या वर्षभरात ती अधिक तीव्रतेने झाली.
कौटुंबिक जबाबदारी मध्ये काकांना भक्कम आधार लाभला
आमचे पिताश्री स्व. उदयसिंह निंबाळकर यांचे वडील स्व. नानासाहेब निंबाळकर यांचे kअकस्मात निधन झाले, त्यावेळी स्व. काकांच्यावर ऐन तरुण वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली, पण त्यांनी न डगमगता ही संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि वडिलांच्याप्रमाणे मोठी शेतजमीन व कुटुंब सांभाळत पुढे जाणे सुरु ठेवले, त्या दरम्यान त्यांचा विवाह माळेगाव येथील काटे देशमुख कुटुंबातील विमलताई यांच्याशी झाला, आणि स्व. काकांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी एक भक्कम आधार मिळाला.
कुटुंब वत्सल स्व. काका आणि स्व. काकी यांनी आदर्श निर्माण केला
विवाहापूर्वी कुटुंबात स्व. काकांची आई, ३ बहिणी अशी मोजकी माणसे होती, पुढे बहिणीच्या दोन मुली (भाच्या) स्वतःची ४ मुले, १ मुलगी अशा १३ – १४ जणांची जबाबदारी काका आणि काकिंच्यावर होती, आपल्या ५ मुलांबरोबर बहिणींच्या दोन मुलींची शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली व समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवला.
आदर्श सरपंच व सच्चा माणूस : स्व. काका
लहानपणा पासून अतिशय हुशार, प्रामाणिक व जिद्दी असलेल्या स्व. काकांनी स्वकष्टाने स्वतःची ओळख निर्माण करुन निंबळक ग्रामपंचायत सरपंचपद २ वेळा भूषविले आणि अत्यंत चांगले काम केले. आदर्श सरपंच म्हणून त्या काळात काम करणारे माझे वडील खुप प्रामाणिक व सच्चा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती, आम्हाला त्यांचा कायम आभिमान वाटायचा. वडिलांनी खुप कष्टातून संसाराची उभारणी केली, त्यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य आम्हाला अचंबित करते. गावचे ग्रामदैवत व आमचे कुलदैवत श्री निमजाई देवी मंदिरासाठी त्यांनी पूर्वी स्थापन केलेला ट्रस्ट, मंदिर उभारणी साठी आम्हाला खूपच उपयोगी ठरला समाजामधील गरजू दुर्बल घटकातील लोकांच्याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे त्याच्या अडीअडचणीला ते हक्काचे ठिकाण असायचे व त्यांचेबरोबर ते जास्त रमायचे. गावातील तसेच घराघरातील वाद विवादात त्यांचा शब्द अंतीम असायचा.
संकटावर पाय ठेवून उभे रा शिकवण स्व. काकांची व काकींची
नंतरच्या काळात आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी त्यानीं पुणे/ बेळगाव शहराची निवड केली व मुलांना उत्तम मार्गदर्शन करत उद्योग धंदा वाढविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देऊन त्यांना प्रोत्साहित केले.
कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभं राहण्याची शिकवणूक त्यांनी दिली. स्वतःच्या कष्ट व मेहनतीच्या जोरावर यश मिळविण्याचा मंत्र दिला व आपल्या हयातीत त्यानी मुलांची आपल्या गावाची नाळ कधी तुटू दिली नाही, ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत समाज प्रबोधन करुन अनेकांना विचार व आधार दिला.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या उक्ती प्रमाणे आचरण व शिकवण
सत्यनिष्ठा, मानवता ही काकांनी आम्हाला शिकवली. आमचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय गरीब व खडतर परिस्थितीत अत्यंत सचोटीने व कष्टाने ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचकरी’, या संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे आचरण केले. त्यांच्या आदर्श व विचारांना काटे देशमुख कुटुंबातील आदर्श व वैचारिक बैठक लाभलेल्या स्व. विमलताई तथा काकिंची साथ उपयुक्त ठरली आणि स्व. काकांचा आदर्श घेऊन स्व. काकी यांनी कुटुंबाप्रमाणे सामाजिक कार्यात स्व. काकांच्या प्रमाणेच आपला वेगळा ठसा उमटविला.
स्व. काका आणि स्व. काकी यांचे आदर्श, विचार, मार्गदर्शन उपयुक्त ठरेल
अर्थात स्व. काकांचा अधिक वेळ स्वतःची शेती व कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याबरोबर विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जात असल्याने स्व. काकिंनी आम्हा भावंडांची आणि त्यानंतर आमच्या कुटुंबाची म्हणजे सूना, नातवंडांच्या कडे पूर्ण लक्ष देत कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळली, त्यामुळेच गेले वर्षभर एक दिवस ही आम्ही त्यांचे आदर्श, शिकवण, मार्गदर्शन यापासून दूर जाऊ शकलो नाही. सतत त्यांच्या आठवणी आणि आदर्श आम्हाला मार्गदर्शक ठरले आहेत.
आगामी काळातही स्व. काका आणि स्व. काकी यांचे आदर्श, विचार, मार्गदर्शन याबाबत त्यांच्या आठवणी आम्हाला निश्चित मार्गदर्शक ठरतील, किंबहुना त्यांच्या आठवणी द्वारे आम्ही सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पूर्णत्वास नेऊ असा मला विश्वास आहे.
त्यांचे सुसंस्कार स्मरणात ठेवून आम्ही आमची वाटचाल करत आहोत, भविष्यात देखील त्यांनी दाखविलेल्या वाटेवरुन आम्ही चालत राहू. स्व. काका आणि स्व. काकिं यांचा समर्थ वसा, वारसा चालविण्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंबिय कटिबद्ध आहोत.
स्व. काका व स्व. काकिंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
– राम निंबाळकर
उद्योजक राम निंबाळकर यांच्या मातोश्री स्व. विमलताई निंबाळकर तथा स्व. काकी यांचा प्रथम स्मृतीदिन(वर्षश्राद्ध) श्रावण शु १५, सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी निंबळक, ता. फलटण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ह.भ.प. संजय नाना धोंडगे, नाशिक यांचे श्रवणीय कीर्तन होणार आहे.