ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे


दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२३ । फलटण । फलटण हे संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारावर आधारलेले शहर, या शहरातील ग्रामदैवत पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहणाद्वारे येथील विश्वस्त मंडळ आणि भाविकांनी फलटणच्या परंपरेला साजेसे काम केले, आपणही सर्वजण त्यामध्ये सहभागी झालात, ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटणचे ग्रामदैवत, पुरातन श्री काळभैरवनाथ श्री जोगेश्वरी मंदिर, भैरोबा गल्ली, फलटण जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा नुकताच विधीवत संपन्न झाला.

महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते जिर्णोद्धार लोकार्पण आणि कलश पूजन करण्यात आले, त्यानंतर श्री सेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगावचे मठाधिपती १०८ प.पू.महंत श्री सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण संपन्न झाले. आ.दिपकराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपला या शहराशी निकटचा संबंध आहे, तथापि अलीकडे सर्वांच्या भेटी होत नसल्याचे नमूद करीत खूप दिवसांनी भैरोबा गल्लीत येण्याचा योग आला, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, अनेक जुनी मंडळी भेटली, नव्या पिढीतही आपल्या ओळखी झाल्या असल्याने तुम्हा सर्वांना भेटल्याचे समाधान लाभल्याचे सांगत आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरीचे आशिर्वाद तुम्हां आम्हां सर्वांच्या पाठीशी असल्याने आपण भाग्यवंत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाप, ताप, दुःख, दारिद्र्य, शारीरिक, मानसिक त्रास हे प्रत्येकाला जन्मापासून येतात त्यातून बाहेर पडण्यासाठी ८४ लाख योनीच्या फेऱ्यातून जाताना माणूस म्हणून जगण्यासाठी, या संसार सागरातून तरुन जाण्यासाठी संतांच्या रुपाने परमेश्वर तुम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या जवळ आहे, याची आठवण ठेवा आणि त्याचे स्मरण करा, तो तुम्हाला नक्की योग्य मार्ग दाखवेल याची ग्वाही देत श्री सेवागिरी महाराज देवस्थान, पुसेगावचे मठाधिपती १०८ प.पू.महंत श्री सुंदरगिरी महाराज यांनी गीतेमधील १५ व्या अध्यायाचा दाखला देत भगवंत तुमच्या पाठीशी असल्याचे निदर्शनास आणून दिले.

माता, पिता, वास्तूदेव, कुलदैवत आणि ग्रामदैवत या ५ दैवतांची सेवा करा, नामस्मरण करा तुम्हांला संसाररुपी सागरातून तरुन जाण्यात कसलीही अडचण येणार नाही, याची खात्री देत मंदिर उभारणे किंवा त्याचा जिर्णोद्धार आणि कलशारोहण ही फार कठीण बाब नाही, पण उभारलेल्या या मंदिराची स्वच्छता आणि नियमीत तेथे जाऊन भगवंतांची सेवा, दर्शन, नामस्मरण ही अत्यंत अवघड बाब असून या मंदिरात जा, त्याचा धावा करा तो तुमचे संरक्षण नक्की करेल, याची खात्री प.पू.सुंदरगिरी महाराज यांनी स्पष्ट शब्दात दिली.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले, जुने फलटण हे तुम्हां आम्हां सर्वांचे दृष्टीने एक अनमोल ठेवा आहे, श्री काळभैरवनाथ मंदिर, शंकर मार्केट, येथील पुरातन मंदिरे हा फलटणचा गाभा आहे, सर्वांनी त्याच भावनेतून या मंदिराचा जिर्णोद्धार व कलशारोहण उपक्रमात तन, मन, धनाने सहभागी होऊन आपली भक्ती, आपल्या भावना श्री काळभैरवनाथ चरणी अर्पण केल्या, आपणही त्याच पद्धतीने भक्ती, भावना अर्पण करीत आहोत. एक चांगला उपक्रम हाती घेऊन तो यशस्वी केला आणि त्यामध्ये सहभागी करुन घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

आ.दिपकराव चव्हाण यांनीही मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सोमवार दि.२७ रोजी सकाळी ०८ ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत वेदशास्त्र संपन्न, मुख्य पुरोहित चंदूकाका वादे व इतर ब्रह्मवृंद यांचे पौरोहित्याखाली श्री गणपती पूजन, पुण्याहवाचन, होमहवन हे धार्मिक विधी संपन्न झाले.

भैरोबा गल्ली, फलटण परिसरातील माहेरवाशीण यांचा “साडीचोळी” देऊन यथोचित सत्कार रामदास हरिभाऊ पवार व पवार कुटूंबियांच्या वतीने करण्यात आला, “महाप्रसाद” आयोजन सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई सुनिल सदाशिवराव बाजारे व सौ.तेजश्री सुनिल बाजारे आणि बाजारे कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले, मंदिरास “रंगरंगोटी” के.बी.एक्सपोर्ट संचालक सचिन यादव व हेमंत वसंतराव रानडे यांच्यावतीने करण्यात आले. मंदिरात “नगारा” मधुकर शंकरराव आंबोले व आंबोले कुटुंबीयांचे वतीने बसविण्यात आला, मंदिराचा “श्री काळ भैरवनाथ व माता जोगेश्वरी प्रसन्न” लाईट बोर्ड गणेश शिवाजीराव पवार व पवार कुटुंबीयांचे वतीने बसविण्यात आला.

सोहळ्या निमित्त माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोंसले, माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे, सुनिल मठपती, श्रीमती रंजना कुंभार, सौ.दिपाली निंबाळकर, सौ.सुवर्णा खानविलकर, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ.प्रगती कापसे तसेच शिवाजीराव घोरपडे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेवराव माने, उद्योजक अमित भोईटे, अमोल भोईटे, राहुलभैय्या निंबाळकर, सुनिल बाजारे, सौ.तेजश्री बाजारे, सौ.सुजाता यादव, ॲड.मिलिंद लाटकर, हेमंत रानडे, हेमंत खलाटे, मंदिर शिल्पकार आप्पासो लांडगे, कळस शिल्पकार मधुकर आपरे आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भैरोबा गल्लीतील युवक, नागरिक बंधू-भगिनी यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.अशोकराव जाधव, उपाध्यक्ष प्रदीप पवार, नंदकुमार घारगे, अरुण आंबोले, मधुकर आंबोले, अनंत भोंसले, संजय पालकर, अविनाश पवार, रामदास पवार, गोरख पवार, शाम कापसे, भाऊ कापसे, रामचंद्र भोसले, संजय डमकले, राजेंद्र भांडवलकर विश्वस्त मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास भैरोबा गल्ली परिसरासह फलटण शहर व तालुक्यातील युवक, नागरिक बंधू-भगिनी, आबालवृद्ध यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

श्री भैरवदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने जीर्णोद्धार ते कलशारोहण कार्यक्रमापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार व सोहळ्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते प्रमोद रणवरे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!