दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२४ | फलटण | मुधोजी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाईसाहेब महिला प्रशिक्षण केंद्र पुरस्कृत श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंह नाईक निंबाळकर स्मृतीप्रित्यर्थ ‘विजय माला पुरस्कार प्रदान समारंभ २०२४’ हा पुरस्कार सोहळा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध निवेदिका, आकाशवाणी केंद्र पुणे येथील सौ . गौरी लागू उपस्थित होत्या. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन आणि फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी या पुरस्काराबद्दलची माहिती देत सन्माननीय अतिथींचे स्वागत करून सर्व उपस्थित महिला भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर प्राध्यापिका डॉ. सीता जगताप यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयमाला पुरस्कार प्राप्त आदर्श माता सौ. हेमा नाळे यांच्या कार्याची ओळख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित यांनी करून दिली.
महिला सामाजिक जनजागृती पुरस्काराच्या मानकरी सौ. वैशाली चोरमले यांच्या कार्याची माहिती डॉ. ए. एन. शिंदे यांनी करून दिली. त्यानंतर महिला उद्योजिका सौ. सुजाता यादव यांच्या कार्याची माहिती प्राध्यापिका जे. पी. बोराटे यांनी करून दिली. या तीनही सत्कारमूर्तींना पुरस्कार प्रदान करतेवेळी सन्माननीय गौरी लागू यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन उचित सन्मान करण्यात आला.
यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांनी मनोगत व्यक्त करत पुरस्कार प्राप्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून आजच्या स्त्रियांचे कुटुंबातील आणि मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्त्री जीवनातील विकासाचा आढावा घेत, स्त्रियांशिवाय मानवी जीवनातील कोणतेही यश शक्य नाही, हे मत विशद करत श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर कशा पुरोगामी विचार रुजविणार्या होत्या, हे सांगून महिलांना केवळ एक दिवस सन्मान न देता नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन करून सर्व भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून प्राध्यापिका डॉ. सविता नाईक निंबाळकर, तसेच मुधोजी महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राच्या समन्वयक म्हणून प्राध्यापिका डॉ. सीता जगताप यांनी उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. नीलम देशमुख आणि प्राध्यापिका डॉ. सौ. ज्योती काळेल यांनी केले. प्रा. उर्मिला भोसले यांनी आभार मानले.