दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. 31 ऑक्टोबर या जयंतीचे औचित्य साधून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अशोक शिर्के यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांचा शुभेच्छा संदेशाचेही वाचन करण्यात आले.
सप्ताह निमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामसभा, ऑनलाईन चर्चासत्र, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती, रांगोळी स्पर्धा, खाजगी-प्रवासी वाहतुक करणाऱ्या चारचाकी व तीनचाकी वाहनांची रॅली इ. कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 27 ऑक्टोबर रोजी आकाशवाणी सातारा केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार दि. 28 ऑक्टोबर रोजी तळबीड ता. कराड येथे ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे महाविद्यालयीन तरुणांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर रोजी पोलीस करमणुक केंद्र सातारा येथे शासकी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांकरिता भ्रष्टाचार निर्मुलन संदर्भात विविध रांगोळी स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी खाजगी व प्रवासी वाहतुक करणाऱ्या चारचाकी व तीनचाकी वाहनांची रॅली सातारा शहरातून काढण्यात येणार आहे.
रविवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सातारा शहरामध्ये एकता दौड शाहू स्टेडियम ते पोवईनका अशी आयेाजित केली आहे. तर दक्षता जनजागृती सप्ताहाचा समारोप 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.