
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विडणी येथील विद्यानगर शाळेतील ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. एका विद्यार्थ्याने राज्यात नववा क्रमांक पटकावला आहे.
स्थैर्य, विडणी, दि. ४ जुलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत विडणी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद विद्यानगर शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, अर्णव फरांदे याने राज्याच्या गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावला आहे.
अर्णव फरांदे राज्याच्या गुणवत्ता यादीत
शाळेतील एकूण ३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले असून ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यामध्ये अर्णव नितीन फरांदे या विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याची सातारा येथील सैनिक स्कूलसाठीही निवड झाली आहे.
‘या’ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीला गवसणी
अर्णव फरांदे याच्यासोबतच शाळेतील आरोही विशाल आदलिंगे, आयुष धनंजय नाळे, सोहम अविनाश ननावरे आणि अभय शरद महानवर या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती मिळवून यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरामध्ये त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
शिक्षक व मान्यवरांकडून अभिनंदन
या यशासाठी विद्यार्थ्यांना रवींद्र परमाळे, मुख्याध्यापक राजाराम तांबे, रेश्मा कोरडे, कविता चांडोले, सोनाली बोबडे आणि गौरी बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल धीरज अभंग, शिवांजली भोसले, सचिन अभंग, सरपंच सागर अभंग, अक्षय घावटे, गटशिक्षणाधिकारी मठपती, बबन निकाळजे आणि कमल आदलिंगे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.