फलटण तालुक्यातील ६५५५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ – अंमलबजावणीला वेग

राज्य शासनाच्या बहुचर्चित कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत आहे. यात फलटण तालुक्यातील ६५५५ पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 04 जुलै : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रत्यक्ष अंमलबजावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फलटण तालुक्यातील तब्बल ६५५५ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असून, ऐन खरीप हंगामात बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

योजनेचे त्रिसूत्र आणि लाभ

या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ (OTS) योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी आपला वाटा भरल्यानंतर उर्वरित रक्कम शासन जमा करेल. याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रमाणीकरण अनिवार्य

कर्जमुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी महाआयटीच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गाव चावडी, ग्रामपंचायत आणि बँक शाखांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील. लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊन कर्जखात्याचे बायोमेट्रिक किंवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण होताच रक्कम थेट खात्यात जमा होईल. एकवेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिश्शाची रक्कम भरणे आवश्यक आहे.

तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा

कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी, यासाठी जिल्हास्तरावर विशेष तक्रार निवारण समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहकार विभाग, बँका आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे फलटण तालुक्यातील हजारो शेतकरी पुन्हा एकदा कर्जमुक्त होऊन नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत.

Back to top button
Don`t copy text!