दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२४ | फलटण |
फलटण शहर, उपनगर व तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वार्यासह, विजांच्या कडाडाटात मुसळधार पाऊस झाला. या पावसात फलटण शहरासह तालुक्यात नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. घरांच्या भिंती पडल्या, पत्रे उडाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
दरम्यान, या पावसातच सरडे (ता. फलटण) येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेला युवक कै. ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (रा. जामखेड, ता.जि. अहमदनगर) हा वीज पडून मृत्युमुखी पडला. त्याच्या मृत्यूचा पंचनामा करून त्याच्या नातेवाईकांना प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी फलटण तहसील कार्यालयामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी कै. ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले यांचे आई-वडील तसेच अन्य नातेवाईक (राहणार जामखेड, तालुका-जिल्हा अहमदनगर) येथून प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्याकामी तहसील कार्यालय फलटण येथे उपस्थित होते. त्यांना मदत देण्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया आज पूर्ण केली आहे. रक्कम रुपये चार लाख ही कै. ज्ञानेश्वरच्या वारसांच्या नावे पुढील आठवड्यात थेट ‘डीबीटी’द्वारे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे या पावसाने अलगुडेवाडी (ता. फलटण) येथील खातेदार अंकुश तुकाराम जाधव यांच्या घरावरील पत्रा उडाला आहे. कापडगाव (ता. फलटण) येथील नाना तात्याबा करे यांच्या घराचे वादळी वार्यामुळे नुकसान झाले आहे. आंदरूड (ता. फलटण) येथे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या धोंडीबा साधू चव्हाण यांच्या घराचा पंचनामा केलेला आहे.
मिरेवाडी येथील यादव कोंडीबा चव्हाण यांच्या शेडची पडझड झाली आहे. रावडी खुर्द मधील गरीब मागासवर्गीय कुटुंबातील तरुण शेतकरी श्री. किशोर अशोक गायकवाड यांचे खूप नुकसान झाले आहे.
या सर्व पडझडीचे, नुकसानीचे पंचनामे फलटण तहसील कार्यालयामार्फत पूर्ण झाले असून त्यांना तातडीने प्रशासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहितीही फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.