बुधवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून दोन हजार पन्नास क्युसेक्स वेगाने विसर्ग – निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
स्थैर्य, लोणंद, दि. १२ : सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण भरण्याच्या मार्गावर असून बुधवारी संध्याकाळी चार वाजता वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलुन एक हजार २०० क्युसेस तर विद्युत गृहातूनही आठशे क्युसेक्स पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोऱ्यात असलेली भाटघर ७०.६२ ,नीरा देवधर ५८.६९ , गुंजवणी ८७.२० टक्के ही सर्व धरणे गेल्या आठवडयापासुन पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण ९७.४८ टक्के भरले आहे . वीर धरणातून बुधवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने वर उचलुन एक हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत आहे . तर विद्युत गृहातूनही आठशे क्युसेक्स पाणी आधीपासूनच सोडले जात आहे. असे एकुण दोन हजार पन्नास क्युसेक्स वेगाने विसर्ग होत असल्याने धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .