
दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील खटकेवस्ती, गोखळी, गवळीनगर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही वसुबारस उत्साहाने साजरी करण्यात आली. खटकेवस्तीपासून गवळीनगर, गोखळीपाटी येथून देशी गायींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर पूजन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी सुवासिनींनी गायींना नैवेद्य दाखवून पूजन केले.
वसु म्हणजे द्रव्य, अर्धात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे व्दादशी म्हणून या दिवसाला ‘गोवत्स व्दादशी ’असे म्हणतात. पाडसासह धेनू ही समृध्दता आणि सफलतेचे प्रतिक आहे.पारंपरिक पद्धतीने सवत्स गायीची पूजा करून आपला आदरभाव व्यक्त केला जातो. या निमित्ताने गोवत्सव्दादशी म्हणजे गायी-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. देशी गायींची संख्या कमी होत आहे. देशी गोसवर्धन, त्याची वैशिष्ट्ये याचा जास्तीतजास्त लोकांपर्यंत प्रसार होणे गरजेचे आहे, असे वस्ताद पै. अनिल गावडे यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून गोखळी आणि परिसरात वसुबारस निमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात देशी गायींची मिरवणूक काढण्यात येते. या कार्यक्रमाला खटकेवस्ती, गवळीनगर गोखळीपाटी, गोखळी येथील ग्रामस्थ आणि जय हनुमान तालीम संघाचे पैलवान आपली गायी वासरे घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. खटकेवस्ती येथे गायींना नैवेद्य दाखवून पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्ताद पै. अनिल गावडे, बबलू गावडे, गोखळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सखाराम जगताप, सौ. शालन अनिल गावडे, धनश्री गावडे, पै. चेतन गावडे, बापूराव माळवे, रोहन गावडे, केशव गावडे, मुन्ना गावडे आणि हनुमान तालीम संघ यांनी परिश्रम घेतले.