
थेट WhatsApp वर मिळवा
पावसाळ्यामुळे चार महिने बंद असलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक वासोटा किल्ला १५ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वैभव आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला चार महिन्यांच्या खंडानंतर गुरुवार, १५ ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व पावसाळ्यामुळे बंद असलेले पर्यटन पुन्हा सुरू होत असल्याने मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा आणि अंबवडे परिसरातील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.
वासोटा परिसर घोषित झाला ‘सायलेन्स झोन’
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉर्बेट प्रकरणातील आदेशानुसार व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून वासोटा किल्ला व परिसर ‘सायलेन्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार पर्यटकांना परिसरात मोठ्याने घोषणा देणे, गोंगाट करणे आणि स्पीकर वाजवण्यास बंदी असणार आहे. या निर्णयामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आणि निसर्गाची शांतता अबाधित राखण्यास मदत होणार आहे.
असे असेल प्रवेश व इतर शुल्क
किल्ल्यावर भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वनविभागाने प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये प्रौढ व्यक्तींसाठी १५० रुपये, ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ७५ रुपये प्रवेश शुल्क राहील. याशिवाय गाईड शुल्क ३०० रुपये, बोट पार्किंग शुल्क २०० रुपये आणि डीएसएलआर कॅमेऱ्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दरम्यान, गडावरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी वनविभागाकडून ‘जुना वासोटा’ यासह नवीन पर्यटन पॉईंट विकसित करण्याचे सर्वेक्षण सुरू आहे.





