स्थैर्य, मुंबई, दि. १७ : भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेले 81 वर्षीय राजकीय कार्यकर्ते आणि कवी वरवरा यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
सोमवारी संध्याकाळी तब्येत खराब असल्याने वरवरा राव यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राव यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
कुटुंबीयांचा आरोप
जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केल्यानंतर राव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घेतली. वरवरा राव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात राव यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नसल्याचा आरोप केलाय. ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट या संघटनेनेही कुटुंबीयांच्या आरोपावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिलं आहे.
ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट संघटनेचे राष्ट्रीय सचिव हेन्री टिफांगे म्हणाले, “राव यांच्या तब्येतीबाबत आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिलं आहे. वरवरा राव यांना खासगी रुग्णालयात दाखल करावं अशी आमची मागणी आहे. मला आशा आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याबाबत लवकरच आदेश देईल.”
कुटुंबीयांच्या आरोपावरून ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट संघटनेने 15 जुलैला एक निवेदन जारी केलं होतं.