स्थैर्य, सातारा, दि. २७ : वैशाली माने यांची नुकतीच पोलिस अधिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे सातारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वैशाली माने या जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्राचार्य उत्तमराव माने यांच्या द्वितीय कन्या आहेत. प्राचार्य उत्तमराव माने हे पाटण तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी असून त्यांचे ढेबेवादी खोऱ्यात चांगले राजकीय वलय आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील हत्तीखाना येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण कन्या शाळा सातारा येथे झाले. तसेच पदवीपुर्व शिक्षण सायन्स कॉलेज सातारा येथे झाले त्यानंतर इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज मध्ये बीएसएलएलबी ची पदवी संपादन केली. तसेच नुकतीच त्यांनी एलएलएम ची मास्टर डीग्री ही संपादन केली आहे. सन् 2009 साली एमपीएसी ची परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची डीवायएसपी पदी निवड झाली. त्यानंतर त्या नाशिक येथे एकवर्षाच्या ट्रेनिंग करीता रवाना झाल्या. नंतर सिंधुदुर्ग येथे प्रोबेशन ट्रेड पुर्ण करून कोल्हापूर येथे डीवायएसपी म्हणून दोन वर्षे कार्यकाळ सांभाळले. त्यानंतर त्यांची पुणे येथील आयुक्त कार्यालयात बदली झाली.
चतूशृंगी येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून दोन वर्ष जबाबदारी सांभाळली. सध्या त्या राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची पोलीस अधिक्षक म्हणून अमरावती येथील पोलिस आयुक्त कार्यालयात पदोन्नती झाली आहे. त्या कोल्हापुर मध्ये डीवायएस पी म्हणून कार्यरत असताना ‘लेडी सिंघम’ या नावाने प्रसिध्द होत्या. त्यांनी तेथे टोलनाक्या संबंधी उठलेला गदारोळ अत्त्यंत शांततेच्या मार्गाने हाताळला होता. तसेच गणपती उत्सवादरम्यानच्या मिरवणुकी दरम्यानचे प्रसंगही अतिशय यशस्वी पणे हाताळले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही पोलिस अधिक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.