दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आज मराठा समाजाचा आरक्षण हा विषय गंभीर झाला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊन आपले उपोषण स्थगित केले आहे. मात्र, सरकारने वेळ न दवडता याबाबत तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी मराठा समाज बांधवांना आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचेही पत्रात जाहीर केले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मराठा समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने आजमितीस ९९% समाज अल्पभूधारक आहे व यामुळेच या समाजातील मुले शिक्षित असूनही बहुतांशी बेरोजगार आहेत. काही गरीब मुले शिक्षणापासून तर काही नोकर्यांपासून वंचित आहेत. यामुळे मराठा समाजातील व्यतींच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देऊन हा विषय संपवावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.