दैनिक स्थैर्य | दि. 03 जानेवारी 2022 | फलटण | फलटण शहराची वाढलेली लोकसंख्या व पुणे पंढरपूर महामार्गावरील महत्त्वाचा थांबा असलेले असे फलटण शहर आहे. येथे कार्यान्वित असलेले उपजिल्हा रुग्णालयाची खाटांची संख्याही 50 असून येथे श्रेणीवाढ होऊन येथील खाटांची संख्या ही 100 होणे आवश्यक आहे. तरी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे केलेली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावानंतर सातारा जिल्ह्यातील पाटण, पुणे जिल्ह्यातील सुपावरून येथील ग्रामीण रुग्णालयांची श्रेणीवाढ करण्यात आलेली आहे. तरी फलटण उपजिल्हा रुग्णालयाची श्रेणीवाढ तातडीने करून फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांची गैरसोय टाळावी. फलटण पासून जिल्हा रुग्णालय हे सुमारे 80 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी पत्रामध्ये नमूद केलेले आहे.
झिरपवाडी येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध ईमारतीमध्ये व मालकीच्या जागेवर ग्रामीण रुग्णालय झिरपवाडी यास मंजुरी देऊन सदरचे रुग्णालय लवकरात लवकर कार्यन्वित व्हावे. सदर शासकीय रुग्णालय होण्याकरिता 20 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. सद्यपरिस्थितीत कोरोनाचे रुग्ण आजही आढळतात मात्र त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फलटणच्या अस्तित्वात असणाऱ्या छोट्याशा ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसलेने ८० कि.मी दूर असणार्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. तरी येथील जनतेच्या आरोग्य विषयीची गरज लक्षात घेता प्राधान्याने निधी उपलब्ध व्हावा, अशी ही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे.