फलटण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील गिरवी, बरड, तरडगाव व निंबळक भागासह अवकाळी पावसाचा तालुक्यातील बहुतांश भागाला तडाखा बसला. अनेक ठिकाणी बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल झाली आहेत. फलटण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर धुक्यासह बरसलेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक संकटात सापडले आहे. फलटण तालुक्यातील गिरवी, बरड भागासह इतर भागामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्ष व डाळिंबाच्या बागांचे झाले आहे.

बुधवारी संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि गार वारे वाहू लागले. फलटण तालुक्यात पाऊस पडणार नाही, अशी अपेक्षा असताना रात्री उशिरा फलटण तालुक्यात सर्वत्र पावसाची सुरवात झाली. फलटण तालुक्यातील सर्व गटांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शुक्रवारीही सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात एकीकडे गुलाबी थंडीचा मौसम सुरु आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. हवामानातील बदलांमुळे ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. हवेच्या दिशेतील बदलामुळे तसेच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पाऊस झाल्याचे स्पष्टीकरण हवामान खात्याने दिलं आहे. तसेच पुढील दोन दिवस सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

फलटण तालुक्यातील फलटण सर्कल येथे ६४ मीमी, आसू ५७ मीमी, होळ ७१ मीमी, गिरवी ६८ मीमी, आदर्की ८७ मीमी, वाठार निं. ६० मीमी, बरड ६४.८ मीमी, राजाळे ७०.८ मीमी, तरडगाव ७६.८ असे मिळुन संपूर्ण फलटण तालुक्यात ६८.९ मीमी पावसाची नोंद झालेली आहे.


Back to top button
Don`t copy text!