अवकाळी पावसाने कास भागातील रस्त्यांची दुरवस्था


दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। सातारा । जिल्ह्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे नुकसान झाले आहे. यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले असून, नाले मातीने भरून गेल्याने मातीचा भराव रोडवर येऊन पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहत आहेत. यवतेश्वर मंदिराच्या पुढील बाजूस कास वूडस टेल लगत व्यावसायिकांनी रोडचे नाले मुजवल्याने मातीचा भराव व पाणी रोडवर येऊन तळे तयार झाले आहे.आटाळी फाटा ते हेरिटेज वाडीच्या दरम्यानच्या उतारावर पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात आहे.
सातारा – घाटाई – वांजळवाडी- कास मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, गेल्या वर्षी दोन भगदाड पडलेली मोरी जैसी थे असल्याने पाणी रस्त्यावर साचून राहिले आहे.

घाटाई मार्गावरून जाताना नवीन दोन मोर्‍या यावर्षी बांधल्या आहेत. मात्र, त्यामध्ये येणार्‍या पाण्याचा प्रवाह जात नसून पाणी शेजारून वाहत असल्याने रस्त्याला तूट लागली आहे. वांजळवाडी ते कास मार्गावरील कच्चा मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, ओढे, नाले, खड्डे आणि
रस्ता एकाच ठिकाणी झाला असून, उन्हाळ्यात मोरीला पडलेल्या दोन्ही चाकोरीवरील भगदाडामध्ये खडी भरली होती. त्या खडीमुळे पाण्याचा प्रवाह वरून वाहत आहे, खडीही वाहून जाऊन तुटलेली मोरी ही उघडी पडू लागल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे अंदाज येत नसल्याने वाहन अडकूनअपघात होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कास पठारवरून येणार्‍या मार्गाची तर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. या मार्गांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. वाहून गेलेले मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!