एसटी प्रवाशांना उन्हाळी सुट्टीत खिशाला बसणार झळ; तिकीट दरात १० टक्के वाढ, १५ एप्रिलपासून अंमलबजावणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटीच्या साध्या, जलद आणि रात्रसेवा बसेसच्या तिकीट दरात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १३ एप्रिल : उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या किंवा पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाने (MSRTC) दरवाढीचा झटका दिला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी गर्दीच्या हंगामात म्हणजेच १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी परिवर्तनशील प्रवास भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साध्या आणि जलद बसेसच्या तिकीट दरात वाढ

साताऱ्याचे राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या साध्या, जलद आणि रात्रसेवा साधारण बसेसच्या प्रवास भाड्यात १० टक्के दराने वाढ करण्यात आली आहे. या १० टक्के मूळ भाडेवाढीसोबतच, महामंडळाकडून आता प्रतिप्रवासी २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ देखील वाढविण्यात आला आहे. सुट्टीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना :

ज्या प्रवाशांनी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीतील प्रवासासाठी आधीच आगाऊ तिकीट आरक्षण (Advance Booking) केले आहे, त्यांनाही या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. अशा प्रवाशांकडून प्रत्यक्ष प्रवास करतेवेळी त्यांच्या आरक्षण तिकीटाचा जुना दर आणि नवीन वाढीव तिकीट दर यातील फरकाची रक्कम वाहकाकडून (Conductor) वसूल करण्यात येणार आहे. > उन्हाळ्याच्या सुट्टीत एसटी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीच्या हंगामाचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे ही तात्पुरती परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली आहे. १५ जूननंतर हे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Back to top button
Don`t copy text!