
दैनिक स्थैर्य । 19 मे 2025 । उपळवे । सोपानराव जाधव । मे महिन्यातील अवकाळी उन्हाळी पावसाने वारूगड, सीतामाई डोंगर, ताथवडा आणि उपळवे परिसरातील लोकांचे चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणले आहेत. सोमवार, १९ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान उपळवे वेळोशीच्या डोंगरावर काळ्या ढगांनी थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस बरसण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळेतच त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन तो पाऊस संपूर्ण परिसर व्यापून टाकला. पावसासोबत विजांच्या कडकडाटाने आणि वादळी वाऱ्याने परिसराची धांदल उडवली.
या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक आणली आहे. उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस फार उपयुक्त आहे. या पावसामुळे खरीप हंगामाची मशागत आणि पेरण्यांना गती येणार आहे. माण तालुक्यातील डोंगरी भाग, वारूळगड, शिधी भांडवली, श्रीपालवन, शेडगेवाडी, कळसकरवाडी, कुळकजाई, बोथे खोकडे, आवळे पठार, राजापूर, फलटणच्या वेळोशी, तरडफ मानेवाडी, ताथवडा, दऱ्याचीवाडी, बोडकेवाडी, सावंतवाडी, उपळवे, दालवडी, मिऱ्याचीवाडी या भागातील शेतकरी या पावसाच्या प्रवाहात पेरण्यांची तयारी करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत.
हा पाऊस उन्हाळ्याच्या मध्यात झाल्याने जमिनीची उष्णता आणि तगमग कमी होऊन जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाने पूर येणार नसले तरी त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये सर्वत्र उन्हाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे वर्तवण्यात आले होते, तो अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला.