काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ


स्थैर्य, सातारा, दि.२०: नागठाणे (प्रतिनिधी ) काशीळ (ता.सातारा) येथे झालेल्या चोरी प्रकरणात तीन अज्ञात इसमांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यानी एक दुकान फोडून १९,६०० रुपये लांबविले.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील दिनकर माने यांचे काशीळ येथील बस स्थानकासमोर स्वीट मार्टचे दुकान आहे. तिथेच शेजारी त्यांचे चुलत बंधूंचे पान शॉप असून रात्रीचे वेळी पान शॉप मध्ये ते झोपण्यासाठी जातात. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांचे चुलत बंधू यांना त्याचे स्वीट मार्टचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास मोबाईलवरून संपर्क साधून कल्पना दिली. त्यावेळी स्वप्नील माने हे बंधू दीपक माने यांच्यासोबत दुकानाजवळ आले असता दुकानाचे शटर उघडलेले दिसले. आतमध्ये साहित्यासहित रोख रकमेची पाहणी केली असता चोरट्यांनी सुमारे १९,६०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
     दरम्यान काशीळ बसस्थानक परिसरात आजूबाजूला पाहणी केली असता तेथीलच मनाली बिअर बारमधून तीन इसम बाहेर येताना दिसले असता त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर तिघे इसम दुचाकीवरून पळून गेले. त्यावरून त्यांनी मनाली बिअर बारचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले. याबाबतची फिर्याद स्वप्नील माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास चालू आहे.

Back to top button
Don`t copy text!