स्थैर्य, पिंपरी, दि.२२: ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अनेक अश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. करोनानंतरच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रासह देशात प्रचंड बेरोजगारी वाढली असून, केंद्राच्या कामगार कायद्यामुळे कामगारांवरही अन्याय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक आज (रविवारी) चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मन की बात’मध्ये खूप काही सांगितले जाते, आश्वासने दिली जातात मात्र त्यानंतर त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. 20 लाख कोटींच्या पॅकेजचा बोलबाला करण्यात आला. मात्र कोणाला फायदा झाला हे कळलेच नाही. यावर राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही अनेकवेळा मुद्दे उपस्थित केले. मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही.
एका बाजूला बेरोजगारी अटोक्यात आणण्यासाठी निर्णय घेतले जात नाही. तर दुसरीकडे कामगारांसाठी अन्यायकारक ठरेल असे कामगार कायदे केले जात आहेत. केंद्राने नव्याने केलेल्या कामगार कायद्यामुळे कामगारांवर अन्याय झाला आहे. मात्र महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या नेत्यांनी कामगारांसाठी योग्य निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीतील कामगारमंत्री देखील योग्य निर्णय घेतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील भाजपावर टीका करताना पवार म्हणाले, सत्तेचा माज आला की जनता ती उतरवित असते. सत्तेचा गैरवापर करून यापूर्वीच्या शासनकाळात अतिरेक करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी विचारांचे असून असा प्रकार आमच्याकडून कधीच होणार नाही.
मंदिरे उघडण्याबाबत योग्य निर्णय
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मंदिरे ही आस्थेचा विषय आहे. करोनामुळे मंदिरांबाबत खूप विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. लवकर मंदिरे उघडली असती आणि करोना वाढला असता तर आज जे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताहेत त्यांनीच करोना वाढल्यामुळे राज्य सरकारवर टीका केली असती.
राज्याचे उत्पन्न घटले
करोनामुळे राज्याच्या उत्पन्न घटले आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नसल्याचे सांगतानाच अजित पवार म्हणाले, करोनाकाळात जगताना दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. करोनाची लस लवकरच उपलब्ध होईल असा विश्वास असून लसीकरणाबाबत राज्य पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. आपणही करोनामुळे आपल्या जिवाभावाचे सहकारी गमावले आहेत. स्वत:ची काळजी घेतानाच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.