
स्थैर्य, वहागाव, दि.२०: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार
हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात विविध
प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शाळेचे मैदान,
किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यासारखे विविध प्रकल्प घेता
येणार आहेत. या निर्णयामुळे शाळेचा परिसर सुंदर होणार असल्याने मुलेही
शाळेत जाण्यासाठी आकर्षित होणार आहेत.
रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्यात येते. कोरोना
परिस्थितीमुळे मजुरांना काम देण्याबरोबरच गावांचा विकास करण्याची सांगड
राज्य शासनाने या योजनेतून घातली आहे. अंगणवाडी व शाळांच्या परिसरात परसबाग
निर्माण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ते करणे, शोषखड्डे घेणे,
पाणीपुरवठा योजना राबविणे आदी प्रकारच्या कामांनाही शासनाने या योजनेतून
मंजुरी दिली आहे. या योजनेतील नियमाप्रमाणे 60 टक्के काम हे अकुशल व 40
टक्के काम हे कुशल मजुरांकडून असणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून या
नियमाचा भंग झाला, तर जिल्हास्तरावर त्याचे प्रमाण योग्य राखण्याचेही आदेश
आहेत. कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजूर व शेतकऱ्यांची आर्थिक
परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात “मागेल त्याला काम’
देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीत भागात
राजेगारही उपलब्ध होईल व विकासकामेही होतील, अशी भूमिका शासनाची आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांसह, पालक वर्गात
समाधानाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्याचा पुढाकार : अमरावती जिल्ह्यातील
चिखलदरा तालुक्यातील जैतादेही गावच्या जिल्हा परिषद शाळेत चिखलदरा पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी व जैतादेही शाळेच्या शिक्षकांनी याबाबतचे नियोजन
केले आहे. “जैतादेही पॅटर्न’च्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून
राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्य आहे. अमरावती जिल्ह्याने
त्यासाठी पुढाकार घेतला असून, तेथील 40 टक्के शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ
पातळीवर प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांनी अशीच कामगिरी
बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचा भौतिक दर्जा व गुणवत्ता
वाढीस मदत होणार आहे.
शाळांची भौतिक सुविधेची समस्या सुटणार
शाळा, अंगणवाडीतील भौतिक सुविधांसाठी सातत्याने जिल्हा परिषदेसह आमदारांकडे
निधीची मागणी संबंधित गावाकडून करण्यात येत असते. रोजगार हमी योजनेतून आता
शाळेतील भौतिक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शाळा व
अंगणवाडीचा परिसर अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. या परिसरात प्रत्येक
ग्रामपंचायत शाळेतील शिक्षक व अंगणवाडीतील शिक्षकांची भूमिका अत्यंत
महत्त्वाची ठरणार आहे.