काकांच्या आठवणींनी “राजविलास’ही गहिवरला; उंडाळेत अंत्यसंस्कार


स्थैर्य, सातारा, दि.४ : जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती ताबा ठेवलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी गोडोली येथील “राजविलास’ या निवासस्थानी गर्दी केली. या ठिकाणी जमलेल्यांनी साश्रुनयनांनी काकांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. डोळ्यातील अश्रूंमुळे काकांचे लाडके “राजविलास’ निवासस्थानही गहिवरून गेले.

जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनून राहिलेल्या विलासकाकांचे गोडोली येथे “राजविलास’ नावाचे निवासस्थान आहे. कऱ्हाडनंतर काकांची भेट घेण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून “राजविलास’वर यायचे. काकांच्या राजकीय वाटचालीचा साक्षीदार असलेले “राजविलास’ निवासस्थान सर्वसामान्यांचा आधार बनून राहिले होते. काकांची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना काकांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात समजली आणि सर्वत्र शोककळा पसरली. हॉस्पिटलमधून सकाळी आठच्या सुमारास काकांचे पार्थिव “राजविलास’ या निवासस्थानी आणण्यात आले. पार्थिव येण्यापूर्वीच त्याठिकाणी काकांवर प्रेम करणाऱ्या हजारोंनी गर्दी केली होती. जमलेल्यांनी पार्थिवाचे साश्रुनयनांनी दर्शन घेत काकांच्या स्मृतींना उजाळा दिला.

या ठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, राजमाता कल्पनाराजे भोसले, डॉ. अनिल पाटील, उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव, प्रल्हाद चव्हाण, नंदाभाऊ जाधव, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, रफिक बागवान, राजन चिपळूणकर, माजी जिल्हा सरकारी वकील सदाशिव सानप, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, ऍड. श्‍यामप्रसाद बेगमपुरे, ऍड. ताहीर मणेर, गुरुप्रसाद सारडा, प्रकाश गवळी, त्रिंबक ननावरे, नीलेश महाडिक यांच्यासह शेकडो नागरिकांनी काकांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना आदरांजली अर्पण केली. काकांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमलेल्या हजारोंच्या डोळ्यातील अश्रू पाहून काकांच्या राजकीय कारकिर्दीचा साक्षीदार असणारा “राजविलास’सुध्दा गहिवरून गेला होता.

दरम्यान आज दुपारी तीनच्या सुमारास माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्यावर शासकीय इतमामात उंडाळे येथे अंत्यसंस्कार हाेतील अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!