दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । कास धरणाचे वाढीव पाण्याची सातारकरांना वाट बघावी लागणार आहे. अद्याप वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही याला पालिकेचा नियोजन शून्य भ्रष्ट कारभार जबाबदार आहे पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकामध्ये नमूद आहे की, विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे . खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालय विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना कास बंदिस्त पाईपलाईन ची सुधारणा व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळवून देण्यासाठी निवेदन दिले यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे
पत्रकात पुढे ते म्हणतात गेली पाच सहा वर्ष पालिकेत मनमानी व नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे . टेंडर ,टक्केवारी, कमीशन यासाठी एकमेकांचे गळे धरून मारामाऱ्या करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरणं बनविले गेले . पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम पालिकेत सुरू होता आता निवडणूक आली की मंजूर नसलेल्या व न होणाऱ्या योजना राबवायच्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांची नारळ फोडायचे मुंबई दिल्ली वारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे फोटोसेशन करून सातारकर यांना बोलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत .
वास्तविकरीत्या सातारकरांसाठी कास धरणाच्या उंचीच्या संदर्भात कामाचे नियोजन करताना वाढीव पाईपलाईनच्या संदर्भातही प्रत्यक्ष अंमलबजावणी व त्याची निविदा प्रक्रिया समांतर पणे राबवणे आवश्यक होते मात्र सातारकारांशी काही घेणेदेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा या शिवाय दुसरे काही दिसत नाही सत्तारूढ आघाडीत नगरसेवकांच्या टेंडर कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणाऱ्या कळवंडी सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत . तर कचऱ्यातही पैसे खाण्याची स्पर्धा सुरू होती .भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटून सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष असा देखावा करून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता यांनी मिळवली आणि पालिकेचा अक्षरशः बाजार करून टाकल्याची सडेतोड टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली .
राज्य सरकारने हद्द वाढीतील भागासाठी रस्ते व मूलभूत सुविधा देण्यासाठी चाळीस कोटी रुपये मंजूर केलेत पण त्यातही पैसे खायला मिळावेत म्हणून आपल्याच मर्जीतला ठेकेदाराला हे काम देणे त्या कामाची टेंडर प्रक्रिया रखडवून शहराच्या विकासाला खीळ घालण्याचे काम सुरू आहे सातारा पालिकेला लुटणारे निवडणूक आली की निवेदन आणि फोटोसेशनच्या विकासाची खोटी स्वप्ने रंगवत नौटंकी करतात . वास्तविक ज्यावेळी निधी अभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते त्याचवेळी वाढीव पाईपलाईनचा प्रस्ताव शासनाकडे सादर करायला हवा होता मात्र त्यावेळी त्यांना कशाचेच घेणेदेणे नव्हते आणि हे प्रशासन झोपा काढत होते ज्यात पैसे आहेत त्यातच यांना इंटरेस्ट असतो हे सातारकर यांना कडून चुकले आहे . पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार त्यानंतर काम सुरू होणार मध्ये पूर्ण कधी होणार तोपर्यंत सातारकरांनी कास चे पाणी फक्त बघतच राहायचे अशी परिस्थिती आहे धरणाची उंची वाढली पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले आता तुमच्या पापाचा घडा भरला असून सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील शिवेंद्रसिंग राजे यांनी पत्रकात म्हटले आहे