
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला हे दोन्ही अपघात सातारा तालुका हद्दीत झाले आहेत. मेढा सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात खेड येथील युवकाचा सातार्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुशांत प्रकाश कांबळे (वय 35, रा. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी सुशांत कांबळे हा दुचाकीवरून मेढ्याहुन सातार्याकडे येत होता. यावेळी चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत त्याची दुचाकी अचानक घसरली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला तत्काळ सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान दुसरा अपघात सातारा तालुक्यातील काशीळ गावच्या हद्दीत झाला. समोर चाललेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील गौरव लोहार (वय 28, रा. खाशीळ) हा युवक गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.