जावली तालुक्यात जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । कुडाळ । जावळी तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्‍चिम विभागात विक्रमी पाऊस पडल्यामुळे महू धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला असून रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच तर कुडाळ पाचवड रस्ता व साईटपट्ट्या सर्व वाहून गेले आहेत. दरम्यान, भात कचरे व शेती जलमय झाली आहेत.

केळघर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे केळघर येथील ओढ्याला पूर आल्याने येथील पूलाचे बांधकाम सुरू असून पर्यायी रस्त्याचा भराव वाहून गेल्याने सातारा-महाबळेश्‍वर वाहतूक ठप्प झाली तर वेण्णा नदीला आलेल्या पूरामुळे नांदगणे- पुनवडी दरम्यानच्या पुलावरुन पाणी वाहून त्यावरील डांबर, खडी भराव वाहून गेल्याने या परिसरातील वाहतुक ठप्प झाली असून हा पूलही वाहतुकीस धोकादायक बनला आहे .

केळघर (ता. जावली) परिसरात जून महिन्यानंतर ओढ दिलेल्या मान्सूनचे काल (बुधवारी) जोरदार आगमन झाले. संततधार पावसाने वेण्णा नदीसह ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सातारा-महाबळेश्‍वर रस्त्याचे काम व येथील ओढा पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता बनवला आहे. परंतु ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या ओढ्याला आलेल्या पूरामुळे व येथे लावलेल्या मोर्‍या अपुर्‍या असल्यामुळे येथून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पश्‍चिमेकडील शेती दुसर्‍यांदा पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या ओढयालगत असणारी आनंदा भिलारे यांचे स्ट्रॉबेरी शेत, पाईपलाईन, विहीर तसेच सचिन बिरामणे, आनंदा बिरामणे, मोहन बेलोशे, चंदू चव्हाण, राघव बिरामणे यांच्या लागण केलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे. केळघर घाटातही दरडी कोसळत असून त्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम चालू आहे. मात्र, या रस्त्याचे सुरू असल्यामुळे रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव, दगड-धोंडे ओढ्या-नाल्यातून वाहून जाऊन नांदगणे येथील शेतात जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे. केळघर बाजारपेठेत नाल्यांची कामे अपुरी असल्यामुळे अनेकांच्या दुकानात, घरात पाणी घुसून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूलाचे तसेच रस्त्याची बाजारपेठेतील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. असे ग्रामस्थांनी वारंवार सांगूनही तसेच जून महिन्यात याच रस्त्यावरील मामुर्डी येथील भराव असाच वाहून गेला तरीही संबधित ठेकेदाराचे काम हे कासवगतीने चालू असून याचा फटका केळघर घाट तसेच केळघर, सावली, मेढा परिसरातील शेतकर्‍यांना बसत असून संबधित ठेकेदार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. अशा मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अशा ठेकेदारावर लोकप्रतिनिधी केव्हा अंकुश ठेवणार असा सवाल ग्रामस्थांभधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, काल सायंकाळी मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल माने हे गस्त घालत केळघर परिसरात आले असता केळघर येथील ओढयापूलावरील धोका त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येथील युवकांना घेऊन या पुलाच्या दोन्ही बाजूला दगड लावून व बांधकाम विभागाला सूचना केली . अन्यथा काल रात्री सावित्री पूला सारखी दुर्धटना घडली असती.

बांधकाम विभागाने या रस्त्यावरील वाहतूक आंबेघर -डांगरेघर- पुनवडी मार्गे नांदगणेवरुन महाबळेश्‍वर अशी वळवण्यात आली आहे.सहायक पोलीस निरिक्षक अमोल माने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम यांनी घटनास्थळी भेट देवून कामगारांना सतर्क रहाण्यास सांगितले आहे. दरम्यान, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे उपअभियंता निकम यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!