चिकमहुदजवळील अपघातात वरकुटे-मलवडीचे दोन तरूण ठार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । माण । वरकुटे-मलवडी ता.माण येथील सुशांत शांताराम जाधव व मंगेश सोमनाथ पिसे या दोन तरुणांचा चिकमहूद जवळील कॅनॉल शेजारी असलेल्या धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरकुटे-मलवडी येथील प्रसिद्ध फोटोग्राफर सुशांत जाधव व मोटारसायकल मिस्त्री मंगेश पिसे हे दोघे फोटोग्राफीच्या कामानिमित्त मोटारसायकलवरुन चिकमहुदकडे जात होते. दरम्यान कॅनॉल जवळील धोकादायक वळणावर महुदहून दिघंचीकडे निघालेल्या डंपरशी त्यांच्या दुचाकीशी धडक झाली. या अपघातात सुशांत आणि मंगेश या दोन्हीही होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाला.

या घटनेनंतर वरकुटे-मलवडी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची बातमी समजताच वरकुटे-मलवडीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन,दुखवटा व्यक्त केला तर सर्वसामान्य कुटुंबातील दोन्हीही होतकरू आणि मनमिळावू तरुणांवर काळाने अचानक घाला घातल्याने,वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्व गावभर दोन्ही तरूणांच्या अपघाताचीच चर्चा सुरू असून,हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही तरुणांवर वरकुटे-मलवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!