
स्थैर्य, खंडाळा, दि.२३: शिरवळ, ता. खंडाळा येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पिस्तूल विक्री करण्याकरिता पुणे येथून आलेल्या दोन जणांच्या मुसक्या सातारा एलसीबी पथकाने आवळल्या आहेत तर एक मुख्य सूत्रधार फरार आहे. याप्रकरणी जावेद सुलतान शेख (वय 37,रा. येरवडा, पुणे), इरफान हुसेन शेख (वय 35,रा.कोंढवा ,पुणे ) असे अटक केलेल्या दोघांचे नाव आहे तर पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार हा फरार झाला आहे.
याबाबतची पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर शस्त्रे बाळगणार्यांवर कारवाई करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाकडून शोध मोहीम सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी पुणे येथील दोन जण पिस्तूल विक्रीकरिता दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जोतिराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पंकज बेसके, विजय सावंत यांच्या पथकाने शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी सापळा रचला. यावेळी अॅक्टिव्हा मोपेडवरून (एमएच-12-केबी-8323) आलेल्या जावेद सुलतान शेख, इरफान हुसेन शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह एक देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाईल असा 1 लाख पंधरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिरवळ पोलीसांनी दोघांना अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता दि. 24 डिसेबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. यामधील मुख्य सूत्रधार फरार असून त्याचा शोध शिरवळ पोलीस घेत आहे.
या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार रोहित निकम यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई हे करीत आहे.