स्थैर्य, मुंबई, दि. 19 : मुंबईत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानेही सेंट जॉर्ज रुग्णालय व जीटी रुग्णालयातील करोना सुविधा वेगाने वाढवायला सुरुवात केली आहे.
“या दोन्ही रुग्णालयात येत्या आठवडा अखेरीस तीनशे नवीन खाटा, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा तसेच अतिरिक्त डायलिसिस मशीन सुरू झालेली असतील” असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. “मुंबईत आज घडीला करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी अपुरे बेड असून मुंबई महापालिका साडेतीन हजार खाटांची व्यवस्था पालिकेच्या नायर, केईएम, शीव तसेच अन्य रुग्णालयात करत असून खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून आणखी किमान साडेतीन हजार बेड उपलब्ध होतील”, असे करोनाच्या लढाईसाठी पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.
“राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे मुंबईतील तसेच राज्यातील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी करोनाच्या रुग्णांची तसेच गंभीर रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे अधिक आयसीयू खाटांची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात आठवडा अखेरीस ५४२ खाटा करोना रुग्णांसाठी तयार असतील” असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. “सध्या जीटी रुग्णालयात १२९ खाटा तर सेंट जॉर्ज रुग्णालयात १२२ खाटा असून गुरुवार पर्यंत दोन्ही रुग्णालयात मिळून ५४२ खाटा तयार असतील तसेच आयसीयूत १२० खाटा असतील असे डॉ. लहाने म्हणाले. येथील प्रत्येक खाटेपाशी ऑक्सिजनची व्यवस्था केली असून सेंट जॉर्जमध्ये ७० व्हेंटिलेटर व १४ डायलिसिस मशीन बसविण्यात आली आहेत. सध्या जीटी रुग्णालयात ११२ रुग्ण दाखल आहेत तर सेंट जॉर्जमध्ये १२९ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता आगामी आठवड्यापासून दुपटीहून अधिक रुग्णांना दाखल करून उपचार करता येईल” असे डॉ. लहाने म्हणाले.
“राज्यात १८ मेच्या शासकीय आकडेवारीनुसार एकूण २९,३०८ करोना बाधित आढळून आले. त्यापैकी १४,७८८ रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आली नाहीत तर ४६५१ लक्षण असलेले रुग्ण होते. याशिवाय करोनाचे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची संख्या पाच टक्के म्हणजे ९९३ एवढी आहे. या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने अतिदक्षता विभागात जास्तीतजास्त खाटा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे” असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.