
स्थैर्य, वाई, दि. २७: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरुर (ता. वाई) येथे पुणे सातारा लेनवरील उड्डाणपूलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कारने पाठीमागून मालट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार, सुरुर हद्दीतील महामार्गावरील उड्डाणपूलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा लेनवर ट्रक (एमएच 12 पी क्यू 6846) चा उजव्या बाजूचा पुढील टायर फुटलेने मालट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उभा होता. या उभ्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणार्या झायलो कारची (एमएच 04 जी डी 1205) ने जोरादार धडक दिल्याने झालेल्या अपघातात झायलो कारचा चालक अजय राजेंद्र सुतार (वय 26) व केदार दत्तात्रय वेल्लाळ (वय 25) दोघेही राहणार मसूर (ता. कराड) हे जाग्यावरच ठार झाले. कारमधील सुजित रामचंद्र आवटे (वय 42) व अशोक कांबळे (वय 35) दोघेही राहणार कराड हे दोघे गंभीर जखमी झाले. कारची धडक एवढी जोरदार होती की अर्ध्याहून अधिक कारची पुढील बाजू ट्रकच्या पाठीमागील बाजूस घुसली होती. त्यामुळे कारचालक अजय सुतार व शेजारी बसलेले केदार वेल्लाळ हे जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एस. के. पोवार व त्यांचे कर्मचारी तसेच भुईंज पोलिस केंद्राचे कर्मचारी हजर झाले. अपघातामुळे महामार्गावरुन साताराच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी गंभीर जखमींना सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तर ठार झालेल्यांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. पोलिसांनी अपघातग्रस्त झायलो कार व ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. सुरूर (ता. वाई) पुणे बंगळुरू महामार्गावर मालट्रक व झायलो कारचा झालेला भीषण अपघात.

