यवतेश्वर घाटात डंपर पलटल्याने दोघे जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। कासवरुन सातार्‍याच्या दिशेने येणार्‍या भरधाव डंपर चालकाने पादचार्‍यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबल्याने डंपर घाटातच पलटी झाला. त्यामध्ये दोन मुली गंभीर जखमी झाल्या. डंपर चालक किरकोळ जखमी झाला.त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अलका महसुद मुलाणी , अमुल्या महसूद मुलाणी (दोघी रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी, मंगळवार पेठ सातारा) अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहराच्या दिशेने कास बाजूकडून डंपर भरधाव वेगाने येत होता. पॉवर हाऊस झोपडपट्टी येथील पाच मुली यवतेश्वर घाटात फिरायला गेल्या होत्या. फिरत असताना त्या रस्ता ओलांडत होत्या. अवघड वळणावर समोरून आलेला डंपर त्यांना दिसला नाही. घाटातल्या वळणावर अचानक मुली रस्ता ओलांडत असल्याचे डंपर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या मुलींना वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्याने डंपर जागीच पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. या अपघातात दोन मुली जखमी झाल्या. तसेच डंपर चालकही किरकोळ जखमी झाला.

तात्काळ स्थानिकांनी मदतकार्य करुन त्याची माहिती पोलिसांना दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवान विशाल मोरे हे घटनास्थळी पोहचले तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवानही घटनास्थळी पोहचले. जखमी झालेल्या दोन्ही मुलींना तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!