सलग दोनशे दिवस अव्याहतपणे राबतोय, जिल्हा परिषदेचा ‘कोरोना नियंत्रण कक्ष’ – यशेंद्र क्षीरसागर


 

स्थैर्य, सातारा, दि. १६ : दिनांक 18 मार्च 2020 रोजी कोरोना नियंत्रण कक्षात काम करण्यासाठी मला जिल्हा परिषदेतर्फे बोलावण्यात आले. तेव्हापासून 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत जवळपास सात महिने तेथे काम पाहिले. सर्वांचेच खूप सहकार्य मिळाले. शनिवार- रविवारची तसेच; कोणतीही सुट्टी न घेता कर्मचारी-अधिकारी सातत्याने राबत राहिले आहेत. 

विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून किंबहुना; तशी चाहूल लागल्यापासून मार्च ते आज अखेर सलग दोनशे दिवस म्हणजेच साधारण सात महिने जिल्हा परिषदेचा कोरोना नियंत्रण कक्ष विषाणू वरील नियंत्रणासाठी राबत आहे. अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु त्यावर मात करून सर्व कर्मचारी पुन्हा कक्षात सेवा करण्यासाठी रुजू झाले आहेत. हजारो नागरिकांशी संवाद साधणे, त्यांना आधार देणे, सर्व प्रकारचे रिपोर्टिंग रात्रंदिवस करणे, अशी कामे न थकता, जीवावर उदार होऊन अविरतपणे चालू आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह, तत्कालीन माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, तसेच; सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभाग नियोजन करून सातत्याने उपाययोजना राबवत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे हे देखील सर्व स्टाफसह प्रचंड राबत आहेत. सर्व प्रकारचे काटेकोर नियोजन करीत आहेत. नियंत्रण कक्षामध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन पाटील तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी मार्च महिन्यापासून सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारचे नियोजन करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला चांगले यश सुद्धा मिळत आहे. अधिकाऱ्यांसह कर्मचारीसुद्धा राबताहेत. चंद्रकांत लंगडे, परेश धर्माधिकारी, श्रीमती अनामिका घाडगे, श्रीमती कविता काळे, संकेत शेडगे, सचिन कांबळे, श्रीनिक ,डॉक्टर सुभाष औंधकर, डॉक्टर प्रमोद शिर्के, नटराज पाटील, मनोज पवार, सचिन निंबकर, सुनील खामकर, राहुल यंदे…किती नावे घ्यावीत? यांच्या सोबतच विविध कार्यालयातून नियंत्रण कक्षात त्या त्या वेळी सेवा बजावलेले ही कर्मचारी खूप आहेत. या सर्वांच्या कामाबाबत वेळोवेळी वार्तांकन करण्यात, बातम्या लिहिण्यात, लेख लिहिण्यात, प्रसिद्धी देण्यात खूप समाधान वाटले.तसेच ;विविध माहितीपत्रके तयार करणे, भाषांतर करणे इत्यादी कामात देखील खूप  समाधान वाटले.पत्रकार बंधूंचे अविस्मरणीय सहकार्य मिळाले. सातारा जिल्ह्याचा बरे होण्याचा दर साधारण 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. कार्यालयीन कामासोबतच सकारात्मक माहितीचा प्रसार करणे, आयुष मंत्रालयाच्या सूचनांचा प्रसार करणे,  विविध  प्रकारची सकारात्मक आणि उपयुक्त माहिती जनतेपर्यंत– माहिती पुस्तके ,माहितीपत्रके आदींच्या द्वारे पोहोचविण्याचे कार्य देखील सातत्याने चालू आहे. आरोग्य सेवक आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, कार्यालयीन कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक अशा सर्वांचीच लढाई कोरोना योध्या प्रमाणेच आहे. नियंत्रण कक्षातील विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी: तात्पुरत्या स्वरूपातील नव्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे नवीन स्त्री-पुरुष कर्मचारीदेखील मन लावून काम करीत आहेत. यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसेच; विविध कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल होणाऱ्या आणि डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची नोंद तसेच विविध पातळ्यांवर नागरिकांशी संवाद साधणे इत्यादी प्रकारची रिपोर्टिंग अव्याहतपणे चालू आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील कर्मचारी देखील यामध्ये मनापासून राबत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम नियोजनबद्धरीत्या राबविला जात असून, त्यामध्ये आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक तसेच; प्राथमिक शिक्षक या सर्वांचाच सहभाग आहे. रोज शेकडो नागरिकांना भेटून त्यांची वैद्यकीय तपासणी करून तसे रिपोर्टिंग वेळेवर केले जात आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी आणि नियोजनासाठी सुलभता येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नियंत्रण कक्षासाठी विशेष सोय केली असून सर्वच अधिकारी वारंवार भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. नियोजन करीत आहेत आणि महत्त्वाच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देऊन कामात गती आणत आहेत.एकंदरीतच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि नियंत्रण कक्ष केवळ कार्यालयीन जबाबदारी न समजता राष्ट्रीय कर्तव्य समजून अव्याहतपणे गेले सात महिने राबत आहेत. सर्वांची जिद्द आणि प्रामाणिकपणा यांना मनःपूर्वक सलाम…

.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!