महान स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक लोकमान्य टिळकांना जाऊन आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी शंभर वर्ष झाली. त्यांची आज स्मृतिशताब्दी..!याच दिवशी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊंचा जन्म झाला.त्यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्त या दोन बलाढ्य सिंहांना शब्द सुमनांजली
स्थैर्य, सातारा, दि. ०१ : महान स्वातंत्र्यसेनानी, तत्त्वज्ञ, राजकारणी, लेखक आणि संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रखर देशप्रेम आणि अफाट बुद्धिमत्ता यांच्या जोरावर भारताच्या इतिहासात अढळ स्थान मिळवले आहे.”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”, अशा ध्येयाने पछाडलेल्या लोकमान्यांनी महाराष्ट्रात एक वैचारिक क्रांती घडवून आणली. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर तळागाळात विचार पोहोचवावेत म्हणून 1881 मध्ये “केसरी आणि मराठा “या वर्तमानपत्रांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात केली.1884 ला “डेक्कन एज्युकेशन सोसायटी” आणि 1885 मध्ये “फर्ग्युसन महाविद्यालया”ची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात क्रांती केली.
स्वराज्य मिळवण्यासाठी “होम रुल लीग” ची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे आणि महाराणा प्रताप यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तर स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकमान्यांच्या कार्याने प्रभावित होते.वयाच्या केवळ 26 व्या वर्षी लोकमान्य टिळकांना स्वामी विवेकानंद भेटले. त्यावेळी स्वामीजींचे वय केवळ 19 वर्ष होते. या दोन तरुणांनी प्रचंड विचारमंथन केले. ही घटना 1882 सालातील आहे. त्यांचे विचार जुळले त्यानंतर लोकमान्यांनी “गीतारहस्य” हा सुंदर ग्रंथ लिहिला. त्यामध्ये कर्मयोगाचे महत्त्व भगवद्गीतेच्या आधारे विशद केले. प्रचंड सहनशक्ती, त्याग, कष्ट करण्याची तयारी, ज्वलंत देशप्रेम यांचे प्रतीक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या ; आणि “जो जे वांछील, तो ते लाहो” अशी प्रार्थना या जगासाठी करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या या भूमीमध्ये अनेक सुपुत्रांनी समाजाला विचारात्मक आणि कृतीतून दिशा दाखविली. अण्णा भाऊ त्यापैकी एक मानाचे सुवर्णपान आहे. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. यातून समजते की शाळेतील शिक्षणापेक्षा समाजाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. केवळ दोन दिवस औपचारिक शाळेत शिक्षण घेतलेल्या अण्णाभाउंनी “समाजाच्या शाळेत” मात्र उच्च प्रतीचे आणि संवेदनशील शिक्षण घेतले . ऐन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तरुण अण्णाभाऊ यांनी किती अभ्यास केला असेल आणि अपरिमीत त्याग केला असेल; याची कल्पनाच केलेली बरी. प्रचंड कष्ट, दारिद्र्य आणि अपरिमित संकटे यांच्यावर त्यांनी मात केली. त्रास देणाऱ्या समाजाविषयी तक्रार केली नाही. प्रचंड निरीक्षणशक्ती आणि समाजाविषयी तळमळ या गुणांच्या जोरावर त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. “फकीरा” हे त्यातील एक रत्न होय. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आत्ताच्या काळात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणी यांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचणे, त्यांचे विचार वाचणे आणि त्यानुसार वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण; त्यांनी अशी वाटचाल केली तरच ते इतर समाजाला दिशा दाखवतील आणि इतर समाज सुद्धा समाजशील आणि संवेदनशील होईल. जयंती पुण्यतिथी ही प्रतीकात्मक असते आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. परंतु; विचारधारा स्वीकारणे आणि त्यानुसार वाटचाल करण्याचा थोडासा का होईना प्रयत्न करणे, हे जागरूक आणि जिवंत नागरिकाचे लक्षण आहे. अन्यथा; महापुरुषांना सोनेरी चौकटीत कोंडून ठेवल्यासारखे होते. असे व्हायचे नसेल; तर अण्णा भाऊंचे विचार, तळमळ आणि वाटचाल यांचा अभ्यास करून आत्ताच्या समाजाने त्यानुसार वर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या शिक्षणाचा वापर सुशिक्षितांनी आपल्या गरीब, दीनदलित बांधवांच्या उद्धारासाठी करायला हवा. अण्णाभाऊ….तुमचे विचार, तुमची तळमळ आणि समाजाविषयी तुमची कळकळ; आम्ही प्रत्येक वाडीत, प्रत्येक शहरात, प्रत्येक वस्तीवर शोधतोय. पेरण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला शक्ती द्या. लोकमान्य आणि अण्णा भाऊ; तुमच्या स्मृती हीच आमची खूप मोठी ताकद आहे.