सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दुधेबावी येथील महिलेचे दागिने लंपास करणार्‍या परराज्यातील दोघा आरोपींना १२ तासात अटक


दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२३ | फलटण |
सोने पॉलिश करण्याचा बहाणा करून सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या परराज्यातील दोघा भामट्यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी केवळ १२ तासांत अटक केली आहे. या दोघा आरोपींनी दुधेबावी (ता. फलटण) येथील एका महिलेचे सोने पॉलिश करून देतो, असा बहाणा करून हातचलाखीने मंगळसूत्र व गंठण लंपास केल्याचे कबुल केले आहे. तसेच या आरोपींविरुद्ध परंडा, कळंब पोलीस ठाणे (जि. उस्मानाबाद) येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर आरोपी दि. ९ मार्च रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.ना. गळवे तसेच पो.कॉ. नलावडे हे सतर्कपणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुणवरे (ता. फलटण) येथील मार्केट यार्ड येथे लपून बसल्याचे दिसले. तसेच त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे सुबोध प्रताप शहा व अबोध प्रताप शहा (रा. पंछगंछिया, जि. भागलपूर, बिहार) असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दुधेबावी येथील एका महिलेला फसविल्याचे कबुल केले आहे. वरील आरोपींनी फसवून नेलेले दागिने व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांतदेखील गुन्हे केल्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पो.उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पो.ह. साबळे, पो.ना. अभिजित काशिद, अमोल जगदाळे, धराडे, पो.कॉ. तुषार नलवडे, पो.ना. राणी गळवे यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!