स्थैर्य, सातारा, दि.२८: येथील भूविकास बँक चौकामध्ये एकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करून दोघांनी अंधारात नेवून चाकूचा धाक दाखवून 42 हजारांचा ऐवज लुटून नेला. या सराईत चोरटयांचा शाहूपुरी पोलिसांनी सलग 36 तास मागोवा घेत त्यांना व्याजवाडी येथून पहाटे जेरबंद करुन मुद्देमाल हस्तगत केला. दत्तात्रय उत्तम घाडगे रा. सुर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, करंजे, सातारा आणि लाल्या ऊर्फ मयुर काशिनाथ राठोड रा.आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा अशी संशयितांची नावे असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, दि.26 रोजी सातारा शहरातील भूविकास बँक चौकामध्ये लिप्ट मागण्याचा बहाणा करुन फिर्यादीला दोनजणांनी नर्मदा स्कुलजवळ आंधारात नेले. तेथे फिर्यादीला चाकुचा धाक दाखवुन व मारहाण केली व त्याच्याकडून 42 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास मार्गदर्शन करुन तपासाबाबत सुचना दिलेल्या होत्या. हा गुन्हा सराईत चोरटयाने साथिदारच्या मदतीने केला असल्याचे व व दोघे चोरटे पुणे येथे गेले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन आरोपी शोधार्थ रवाना केले. पथकाने तांत्रिक विश्लेषणव्दारे आरोपींचा पुणे येथे शोध घेतला. परंतु, आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्यानमुळे मिळुन येत नव्हते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींबाबत कौशल्यपुर्ण माहिती प्राप्त केली असता आरोपी व्याजवाडी, ता. वाई असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर तात्काळ पुणे येथून व्याजवाडी येथे येवून सापळा लावून त्यास पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडे चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर कसून चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल हॅन्डसेट, मोटार सायकल, दोन पाकीटे, ए.टी.एम.कार्ड, रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार चाकु असा एकुण 37 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, श्रीनिवास देशमुख, पोकॉ ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल भोसले यांनी केली आहे.