स्थैर्य, सातारा, दि.२१ : भारतीय संस्कृतीत कासवाला अध्यात्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्त्वाचे मानले जाते. हिंदू आख्यायिकांनुसार कूर्म अवतार हा विष्णूचा कासवरूपातील दुसरा अवतार समजला जातो. याला ‘कच्छप अवतार’ देखील म्हणतात. १९९० साली संपूर्ण महाराष्ट्रात सर्पमित्र चळवळीला प्रा. श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अथक परिश्रम करून वेग आणला व सापांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा लोकमनातून नष्ट केल्या. याच संधानात वन्यजीवांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धांबद्दल असलेल्या अधोरेखित मुद्द्यांना हात घातला गेला. पण, अजूनही वन्यजीवांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. कासव हा देखील त्यातलाच एक वन्यजीव. जो रोज शेकडोंच्या संखेने या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या मानवांकरवी बळी जातोय.
कासव कुठे राहतो, असे विचारल्यास बहुतांश लोकांचे उत्तर असणार की कासव विहिरीत, तलावात आणि नद्यांमध्ये आढळतो. पण, साधारणपणे कासवांना आपण तीन प्रकारात विभागू शकतो, पाण्यात राहणारे (Turtles), जमिनीवर राहणारे (Tortoise) आणि पाणी व जमीन दोन्हीवर वावर करणारे (Terrapians). अनेक ठिकाणी मृदु कवचाचा सामान्य कासव, गंगेचा मृदु कवचाचा कासव, फंगशूराटेकटा, चांदणी कासव इत्यादी प्रकारचे कासव आढळतात.
कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात, घरात रोगराई व साठीचे आजार येत नाही अशाप्रकारचे भ्रामक गैरसमज असल्याने काही विशिष्ट जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर कासवांची शिकार करतात व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आंबट शौकिनांना पुरवतात. एकीकडे मानवाच्या अघोरी इच्छापूर्तीसाठी दररोज शेकडो कासवांचा बळी जातोय, काही कासव मानवाच्या गैरसमजांमुळे आजीवन कारावास भोगत आहेत. तर दुसरीकडे याच कासवांना गुप्तधनाचे शोधक समजून २० नखी, २१ नखी सांगून यांची अवैध तस्करी व व्यापार केला जातोय. परिणामतः अतिछळ करून त्यांचा बळी दिला जातोय. यातच भर ते काही लोकांना या प्राण्याला पाळण्याचा छंद जडला आहे. हजारो कासव उत्तर प्रदेशातून त्यांच्या नैसर्गिक आवसातून पकडले जातात आणि अतिशय क्रूर पद्धतीने बंदिस्त करून कधी मुंबईमार्गे तर कधी नागपूरमार्गे विदेशात पोहचवले जातात.
जमातीचे लोक मास्यांसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेले कासव पकडतात. पण, गेल्या काही वर्षात फक्त कासवांच्या शिकारीसाठी विशेषकरून फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. कासव शोधण्यासाठी व पकडण्यासाठी एकप्रकारचे कासवशोधयंत्र वापरल्या जाते, काहीसे त्रीशुलासारखे भासणारे हे यंत्र लोखंडी सळाखींनी बनलेले असून नदी नाल्यांचे पाणीकमी झाल्यावर तळाच्या रेतीमध्ये किंवा चिखलामध्ये हे यंत्र खुपसून-टोचून त्या भागाची पाहणी केली जाते. जिथे कासव आत लपलेला असतो तिथे या सळाखी कासवाच्या पाठीवर आदळून ट्क असा आवाज होतो तेव्हा लगेच तिथे हात घालून त्या कासवाला पकडल्या जाते. कासव शिकार व तस्करीत भारतात बंगाल तर जगात चीन पुढे आहे.
एकंदरीतच, विदेशी व्यक्तींनी भारतात कासवांची तस्करी केल्यास काहीही फरक पडत नाही, असे काहीसे चित्र तयार झाले आहे. बंगालमध्ये तर तथाकथित औषधी बनविण्यासाठी मृदु कवचाच्या कासवांना त्यांच्या पाठीचा किनारीचा नरम असलेला ज्याला इंग्रजीत क्यालीपी म्हणतो तो भाग कासव जिवंत असतांना कापण्यात येतो. त्यानंतर तो कापलेला भाग पाण्यात उकळतात व मग वाळवून त्याची भुकटी तयार करतात या भुकटीचे नियमित सेवन केल्यास म्हणे मनुष्य चिरतरुण राहतो. त्याची मर्दांनकी कायम राहते व वाढते इत्यादी. या सर्वाला काहीही वैज्ञानिक आधार नसतांना केवळ लोकांना फसवून पैसे कमावण्याच्या उद्देशाने या निष्पाप जीवांचा बळी घेतला जातो.
कासव, इतर म्हणजे बकरी, कोंबडी, मासोळ्या, डुक्कर या प्राण्यांसारखा प्रजनन करीत नाही. त्यांचे प्रजनन पोल्ट्रीफार्मसारखे यशस्वीरित्या केल्या जाऊ शकत नाही. कासवांना लैंगिकदृष्ट्या परिपक्व होण्यास १० ते ३० वर्ष सुद्धा लागतात. ते त्या-त्या प्रजातीवर अवलंबून असते. एक पूर्ण वाढ झालेला कासव ज्यावेळी निसर्गात पकडून तो खाण्यासाठी विकल्या जातो, खाल्ला जातो तेव्हा त्या एकाची निसर्गातून रिक्त झालेली जागा भरून निघण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. आज ज्या गतीने आपण निसर्गातील कासव संपवतोय, त्या गतीने कासवांचे निसर्गात प्रजनन शक्य नाही. एकंदरीतच जगातील सर्वात जास्त कासवांच्या जाती आपल्या भारतात आहेत. पण, यातील बहुतांश जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षाचा कारावास आणि २५,००० रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे. कासव बाळगल्याने भरभराट होते, असा अनेकांचा समज आहे. व्यापारी वर्गाकडून तस्करी केलेल्या कासवांची खरेदी केली जाते. कासवांची किंमत नखांवरुन ठरते. साधारणपणे २४ आणि २६ नखे असलेल्या कासवांसाठी मोठी किंमत मोजली जाते. भारतात ब-याचदा अंधश्रद्धा हे कासव तस्करीचे कारण आहे.